नियमित पीक कर्ज परतफेड शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान चतुर्थीपूर्वी द्या

व्हा.चेअरमन विश्वनाथ नाईक यांची सरकारकडे मागणी

⚡बांदा ता.२१-: महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयाला स्थगिती देत पुन्हा नव्या युती सरकारने शेतकऱ्यांप्रती दिलासादायक निर्णय घेतला आहे. पूर आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे. नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मिळणारे 50 हजारांपर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान गणेश चतुर्थी अगोदर मिळावे अशी मागणी मडुरा पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्यावतीने पाडलोस सोसायटी व्हाईस चेअरमन विश्वनाथ नाईक यांनी सरकारकडे केली आहे.
कोकणात गणेशचतुर्थी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो तसे खर्चाचेही निय़ोजन असते. ठाकरे सरकारने नियमित पीक कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या प्रोत्साहन अनुदान निर्णयास नव्या सरकारने स्थगिती दिल्याने शेतकऱ्यांत नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु नव्या सरकारने पुन्हा एकदा शेतकऱ्यांप्रती दिलासा दाखवत 50 हजारांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचे जाहीर केल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
सावंतवाडी तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, वादळ अशा नैसर्गिक आपत्तीत मोठे नुकसान झाले. प्रशासनाकडून पंचनामेही करण्यात आले परंतु काहींना अद्यापही एक रुपयाही मिळाला नाही. केवळ पंचनामे केले जातात मात्र भरपाई काही मिळत नसल्याने श्री.नाईक यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच सरकारने जाहीर केलेले प्रोत्साहनपर 50 हजारापर्यंतचे अनुदान गणेश चतुर्थीपूर्वी शेतकऱ्यांना द्यावे, अशी मागणीही व्हाईस चेअरमन विश्वनाथ नाईक यांनी केली आहे.

You cannot copy content of this page