खोटे रहिवासी दाखले तयार करून प्रवेश घेणाऱ्या त्या त्या विद्यार्थ्यांच्या पालकांची योग्य ती चौकशी व्हावी

अन्यथा शिवसेनेकडून तीव्र आंदोलन;तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांचा इशारा

⚡सावंतवाडी ता.१५-: सावंतवाडी तालुक्यातील सांगेली येथील नवोदय विद्यालयमध्ये परजिल्ह्यातील विद्यार्थी खोटे रहिवासी दाखले तयार करून प्रवेश घेत आहेत, त्यामुळे त्या विद्यार्थ्यांच्या पालकांची योग्य ती चौकशी करूनच दाखले देण्यात यावेत, कोणतीही चौकशी न करता दाखले दिलेले आढळून आल्यास शिवसेनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे दिले.

या निवेदनात राऊळ यांनी म्हटले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी तालुक्यातील सांगेली येथे सुरू करण्यात आलेल्या नवोदय विद्यालयमध्ये परजिल्ह्यातील विद्यार्थी खोटे रहिवासी दाखले तयार करून प्रवेश घेत असून त्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि सी बी एस सी बोर्डच्या शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे गुणवत्ता असूनही त्यांच्यावर अन्याय होत आहे. यावर्षी नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेत 30 पर जिह्यातील विद्यार्थि पास झाले असून, त्यांना प्रवेशावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवासी असल्याचा पुरावा सादर करणे आवश्यक असल्याने यावेळी आपल्या कार्यालयात खोटे कागदपत्र दाखवून प्रवेश प्रक्रियेसाठी दाखले मिळविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांच्या पालकांची योग्य ती चौकशी करूनच दाखले देण्यात यावेत. खोट्या कागदपत्रांच्या आधारे आणि कोणतीही चौकशी न करता दाखले दिलेले आढळून आल्यास शिवसेनेकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राऊळ यांनी दिला.

यावेळी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, चंद्रकांत कासार, शब्बीर मणियार गुणाजी गावडे, श्रुतिका दळवी, परशुराम चलवाडी,योगेश नाईक, एकनाथ नारोजी , अनुष्का कलमीसकर,उल्लास सावंत ,राजू शेटकर,आदी पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page