⚡मालवण ता.११-: जनतेच्या प्रश्नांची जाण नसणाऱ्या आम वैभव नाईक यांना आमसभा घेतल्यावर जनता आपल्यावर तुटून पडेल, आपण त्यांच्या प्रश्नांची उत्तर देऊ शकणार नाही या भीतीपोटी आम. नाईक यांनी गेल्या सात वर्षात मालवण तालुक्यात केवळ दोनवेळा आमसभा घेतल्या त्यामुळे जनतेच्या प्रश्नांवर कलटी घेणारे आम. नाईक हे पळपुटे आमदार असल्याची घणाघाती टीका भाजपचे प्रदेश सरचिटणीस, माजी खासदार निलेश राणे यांनी मालवण येथे पत्रकार परिषदेत केली.
मालवण शहरातील विविध प्रश्नांबाबत माजी खासदार निलेश राणे यांनी मालवण नगरपालिकेवर धडक देऊन मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारल्यानंतर मालवण भाजप कार्यालय येथे पत्रकार परिषद घेऊन आम. वैभव नाईक यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, गणेश कुशे, विजय केनवडेकर, आपा लुडबे, ममता वराडकर आदी व इतर उपस्थित होते.
यावेळी निलेश राणे म्हणाले, गेल्या पाच वर्षात शिवसेनेच्या सत्तेत मालवण शहराची वाट लागली आहे. मोठा भ्रष्टाचार झाला आहे. शिवसेना नगराध्यक्ष आणि त्यांचे सहकारी व आमदार नाईक यांनी एकत्र मिळून शहरावर डाका टाकला आहे. नगरपालिकेचे मुख्याधिकारी शिवसेनेचे पदाधिकारी असल्यासारखे वागत आहेत. सर्व भ्रष्टाचार त्यांच्या नजरेदेखत होत होता. गटार खोदाई न झाल्याने शहरात पाणी साचत आहे, कचरा प्रश्न सुटलेला नाही, नवीन अग्निशमन वाहन छोट्या रस्त्यांच्या ठिकाणी जात नाही, कर्मचारी, कामगार यांचे पगार होत नाहीत, ठेकेदारांची बिले मात्र काढली जात आहेत. कोणाचा पहारा नाही अशा अविर्भावात शिवसेना सत्ताधारी नगराध्यक्ष व टीम वावरत आहे. पर्यटन महोत्सवाला बापाचा माल असल्याप्रमाणे जनतेचा पैसा उडवला गेला. शिवसेना पदाधिकारी स्वतःच्या खिशातील पैसा उडवल्याप्रमाणे स्टेजवर मिरवत होते. या सर्वात मालवण शहर अडकले आहे, शहराला यातून बाहेर काढायला आम्ही नगरपालिकेवर धडक दिली. आमच्या प्रश्नांची उत्तरे मुख्याधिकाऱ्यांकडे नाहीत. माझा दौरा जाहीर झाल्यानंतर त्या त्या प्रश्नाला हात घालण्यास मुख्याधिकाऱ्यांनी सुरुवात केली. प्रत्येकावर कारवाई होणार, भ्रष्टाचार कोणाला करायला देणारा नाही, मालवणचा पैसे लुटू देणार नाही. त्यांना चौकशीच्या चौकटीत घेणार, भ्रष्टाचार करणाऱ्याला चौकशीला सामोरे जावे लागेल. आता शिंदे- फडवणीस यांचे सरकार राज्यात असून भ्रष्टाचाऱ्यांना कशी शिक्षा होते ते दाखवून देऊ असेही निलेश राणे म्हणाले.
आमदार वैभव नाईक यांना जनतेच्या प्रश्नांची जाण नाही. फक्त गटाराच्या बाजूला राहून फोटो काढून घेण्यापलीकडे त्यांचे काम शून्य आहे. ग्रामीण भागात आम. नाईक यांच्या बाबत बोंब आहे अशी टीकाही यावेळी निलेश राणे यांनी केली.
