नियम न पाळल्यास कारवाई करा;नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे आदेश
⚡कणकवली ता.०७-: शंभर मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या, तसेच कमी जाडीच्या प्लास्टिकचे इतर साहित्य आढळले तर नगरपंचायत कडून कारवाई केली गेली. मात्र याबाबत नगरपंचायतने जनजागृती करायला हवी होती. अशी मागणी करत कणकवली शहरातील अनेक व्यापाऱ्यांनी व प्लास्टिक विक्रेत्यांनी नगराध्यक्ष समीर नलावडे यांची भेट घेत चर्चा केली.
जुन्या स्टॉक मधील आढळलेल्या प्लॅस्टिक वस्तू जप्त करत शहरातील अनेक व्यापाऱ्यांवर नगरपंचायतीच्या पथकाने कारवाई केली. यात काही व्यापाऱ्यांकडून प्रत्येकी 1 हजार रूपये दंड वसूल करण्यात आला. ही बाब देखील अन्यायकारक असल्याकडे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांचे व्यापाऱ्यांनी लक्ष वेधले. मात्र यापुढे शासनाचा कोणताही आदेश आला तरी त्याची पहिली जनजागृती करा व त्यानंतरच व्यापाऱ्यांनी नियम पाळले नाही तर कारवाई सुरू करा अशा सूचना नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिल्या.
केंद्र शासनाने १ जुलै पासून १०० मायक्राॅनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या तसेच सिंगल युज प्लास्टिक वापरावर बंदी घातली आहे. त्याअनुषंगाने कणकवली नगरपंचायतीच्या पथकाने शहरातील अनेक व्यापाऱ्यांकडे जाऊन तपासणी केली. यात कमी जाडीचे प्लास्टिक साहित्य आढळलेल्या व्यापाऱ्यांवर 1 हजार रूपये दंडाची कारवाई करण्यात आली. तसेच प्लास्टिक साहित्यही जप्त करण्यात आले. नगरपंचायतीच्या या कारवाई विरोधात कणकवली व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपक बेलवलकर यांच्यासह राजन पारकर, प्रकाश मुसळे, उमेश सापळे, शेखर गणपत्ये, विशाल हर्णे, राजू काळगे, सुशील पारकर, लल्लू ताम्हणेकर, नंदू आळवे, बंडू पारकर, बाळा धुपकर, सुनील काणेकर, सचिन चव्हाण, प्रशांत अंधारी, विलास कोरगावकर, राजू वाळके, राजा कामत, आदींनी नगरपंचायतीमध्ये येऊन नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्याशी चर्चा केली. यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, नगरसेवक संजय कामतेकर, अभिजित मुसळे, ॲड.विराज भोसले, नगरपंचायतीचे स्वच्छता निरीक्षक विनोद सावंत, ध्वजा उचले आदी उपस्थित होते.
व्यापाऱ्यांच्यावतीने दीपक बेलवलकर, राजन पारकर आदींनी मुद्दे मांडले. तर ७५ किंवा १०० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या उत्पादीत करणाऱ्यांवर शासनाने कारवाई करावी अशी मागणी प्रकाश मुसळे यांनी केली. नगराध्यक्ष श्री.नलावडे यांनी नगरपंचायत पथकाचे अधिकारी विनोद सावंत यांना बोलावून कारवाईबाबत विचारणा केली. तसेच कारवाई करण्यापूर्वी शहरातील व्यापाऱ्यांची बैठक घेणे आवश्यक होते. जनजागृती आधीच कारवाई करणे योग्य नाही. कुठल्या प्लास्टिक वापरावर बंदी आणि कुठल्या प्लास्टिकवर बंदी नाही याबाबतची ठोस माहिती व्यापारी वर्गाला द्या. शासनाकडून आलेले परिपत्रक ही व्यापारी प्रतिनिधींना द्या नंतर कारवाई करा असेही श्री.नलावडे यांनी कारवाई पथकाला सुनावले. यावेळी स्वच्छता निरीक्षक विनोद सावंत यांनी जप्त केलेल्या वस्तू सर्व व्यापाऱ्यांच्या बैठकीसमोर दाखवत थर्माकॉल पासून अन्य अनेक प्रकारच्या वस्तू बंदी आदेशामध्ये येत असल्याचे स्पष्ट केले. व्यापाऱ्यांच्या बैठकीवेळी मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनीही येऊन मार्गदर्शन केले. यात थर्माकोलचा वापर कोणत्याही परिस्थितीत होता नये. गणेशोत्सव सजावट व मखर साहित्यासाठी कापड किंवा कागदाचा वापरा करा असेही आवाहन केले. तसेच प्लास्टिक बंदी बाबत ज्या ज्या वेळी शासनाचे आदेश येतील, त्यावेळी त्याबाबतची संपूर्ण माहिती व्यापारी वर्गाला दिली जाईल अशीही ग्वाही श्री.तावडे यांनी दिली.
यापुढे बंदी असलेल्या प्लास्टिकचा साठा ज्या व्यापाऱ्यांकडे आढळेल, त्या व्यापाऱ्यांच्या जीएसटी नंबरसह संपूर्ण माहिती शासनाकडे पाठवली जाणार आहे. तसे निर्देश केंद्र शासनाकडून आल्याची माहिती मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी दिली. तसेच बंदी व्यापाऱ्यांना नियम पाळणे गरजेचे आहे व नियमानुसार कारवाई केल्यास दंडात्मक कारवाई देखील होणार नाही असे श्री तावडे यांनी स्पष्ट केले.
