⚡कणकवली ता ०३-: तळेरे येथील मुंबई विद्यापीठाच्या दळवी महाविद्यालयात स्व. सुनील तळेकर यांच्या 25व्या स्मृतिदिना निमित्त
विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालय, स्व. सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्ट व सार्वजनिक वाचनालय, तळेरे यांच्या संयुक्त विद्यमाने व जिल्हा रक्तपेढी जिल्हा रुग्णालय जिल्हा सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
दळवी महाविद्यालयात दरवर्षीप्रमाणे यंदाही रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यातआले. गेली २५ वर्षे सातत्याने रक्तदान घेऊन जनसामान्यांचे जीव वाचविण्यासाठी विशेष प्रयत्न स्व.सुनिल तळेकर ट्रस्ट करत असतांना मागील काही वर्षापासून दळवी महाविद्यालय व जिल्हा रक्तपेढी सिंधुदुर्ग यांचा संयुक्त विद्यमाने हे शिबीर आयोजित केले जात आहे.
महाविद्यालयाचे मानद मार्ग निर्देशक श्री.विनायक दळवी यांनी लिपीबद्ध केलेले महाविद्यालय गीत व प्रतिज्ञा यावेळी घेण्यात आली.डॉ. मिलिंद कुलकर्णी व अन्य मान्यवरांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
सहा.प्राध्यापक हेमंत महाडिक यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले.डॉ.अभिजीत कणसे, श्रीनिवास पळसुले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. मिलिंद कुलकर्णी या वेळी बोलताना म्हणाले की, ” प्रज्ञा व हुशारी ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, तुमच्या हुशारीने तुम्ही अणुबॉम्ब शोधू शकता पण, तो कुठे वापरायचा हे प्रज्ञा सांगते, दळवी महाविद्यालयात आल्यास पॉझिटिव्ह वाईब्स मिळतात” असे ते म्हणाले.
यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश तळेकर, वाचनालयाचे अध्यक्ष विनय पावसकर, चंद्रकांत तळेकर, डी. एस. पाटिल, श्रीनिवास पळसुले, नारायण वळंजू, हेमंत महाडीक, सतिश मदभावे, अशोक तळेकर, डॉ. अभिजित कणसे, हनुमंत तळेकर, शशांक तळेकर, सिंधुदुर्ग रक्तपेढीच्या डॉ. प्राची तनपुरे आदी उपस्थित होते,सोबतच संस्थेचे मान्यवर महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. डीएलएलई, एनएसएस एनसीसी विभागाचे सहा. प्राध्यापक नितीश गुरव, चेतन नेमण, नरेश शेट्ये,यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. हेमंत महाडीक यांनी,आभार विनय पावसकर यांनी मानले.
