⚡कणकवली ता.०२-:
सध्याच्या बदलत्या युगामध्ये तसेच भविष्यातील वाढत्या बेरोजगारीचा विचार करिता यापिढीतील विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच स्वयंपूर्ण बनण्याची गरज आहे असे प्रतिपादन ॲड. राजेंद्र रावराणे यांनी केले. शंकर महादेव महाविद्यालय, कुंभवडे या प्रशालेचे मुख्याध्यापक विजय सिद्राम शिंत्रे यांच्या सेवानिवृत्तीपर सत्कार सोहळ्यात ते बोलले होते.
शंकर महादेव विद्यालय, कुंभवडे ही शाळा १९८४ साली कै. मामा सावंत यांनी स्थापन केली व कुंभवडयासारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. तदनंतरच्या काळात सदर शाळेमध्ये गुरुकुल स्थापन करण्यात आले. तसेच गिर्यारोहण, सर्पालय, संगीतमंच, योगसाधना तसेच व्यावसायिक, शैक्षणिक ज्ञान इत्यादी उपक्रम सुरु करण्यात आले व त्यामुळे सदरचे विद्यालय हे संपूर्ण कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्रात नावारूपाला आले. सदर शाळेच्या आजपर्यंतच्या प्रगतीमध्ये मुख्याध्यापक विजय सिद्राम शिंत्रे यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांना महाराष्ट्र शासनाने सर्पमित्र म्हणून देखील गौरविले आहे. प्रशालेमध्ये त्यांनी विज्ञान या विषयाचे अध्यापन अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने केले. अशा शिक्षकाचा निरोप समारंभ शंकर महादेव सावंत ग्राम विकास संस्था, मुंबई संचालित शंकर महादेव विद्यालय, कुंभवडे येथे करण्यात आला.
सदर सत्कार समारंभास पंचक्रोशीतील ग्रामस्थ तसेच माजी विद्यार्थी व अन्य शाळांमधील शिक्षकवर्ग देखील शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून उपस्थित राहिले होते. सदर सत्कार समारंभास शंकर महादेव सावंत ग्राम विकास संस्था, मुंबईचे विश्वस्त आर्किटेक संतोष तावडे, सचिव शशिकांत सावंत, खजिनदार बी. के. गुरव, शालेय समितीचे अध्यक्ष अँड. राजेंद्र रावराणे, कुंभवडे गावचे सरपंच तावडे, कनेडी हायस्कूलचे मुख्याध्यापक सुमंत दळवी, निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी मोहनराव सावंत तसेच विजय शिंत्रे यांचे कुटुंबिय व त्यांचे मुळ गाव अंजनी, जिल्हा -सांगली येथील सरपंच तसेच उपसरपंच इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना आपण निवृत्त होत असलो तरी यापुढे देखील सतत शाळेच्या सेवेत रुजू राहीन असे शिंत्रे यांनी आश्वासन दिले.
