⚡ओरोस ता ३०-: सिंधुदुर्ग जिल्हा कृषि प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी खासदार ब्रिगे. सुधीर सावंत यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील विविध शासकीय, अशासकीय व खाजगी संस्थांच्या सहकार्यातून या वर्षी वृक्ष लागवड अभियान हाती घेण्यात आले आहे. १ जुलै हा कृषि दिन म्हणून महाराष्ट्रात साजरा केला जातो. या दिनाच्या औचित्याने कृषि प्रतिष्ठानच्या वृक्ष लागवड अभियानाला सुरुवात होणार आहे.
छत्रपती शवाजी कृषि महाविद्यालय, ओरोस येथे जिल्हा परिषदेचे पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर यांच्या शुभ हस्ते वृक्ष लागवड अभियानाची सुरुवात करण्यात येणार आहे.
यावेळी ओरोस सरपंच सौ. प्रीती देसाई व कृषि प्रतिष्ठानचे सचिव श्री. राजेंद्र सावंत उपस्थित राहणार आहेत. ब्रिगे. सुधीर सावंत माजी खासदार यांच्या संकल्पनेतून हे अभियान सुरु होत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात येत्या पाच वर्षात २० कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्ट आहे. या वर्षी सिंधुदुर्ग मध्ये १० हजार झाडे लावण्याचे नियोजन आहे. याची सुरुवात कृषि दिना पासून करण्यात येत आहे. ही मोहीम १ जुलै ते ३० सप्टेंबर पर्यंत चालू राहणार आहे. कृषि दिना निमित्त १ जुलै ला जिल्ह्यातील विविध ठिकाणी झाडे लावण्यात येणार आहेत. या दिवशी कृषि विज्ञान केंद्र, कृषि महाविद्यालय, ग्रामीण कृषि कार्यानुभव, कृषि विभाग, सैनिक फेडरेशन, वनविभाग, सामाजिक वनीकरण, ग्रामपंचायत कुंदे, किर्लोस, पोखरण, हेदूळ, आडवली, हिवाळे, डॉनबॉस्को स्कूल, देवगड कॉलेज, सावंतवाडी कॉलेज, वेंगुर्ला कॉलेज, रामगड हायस्कूल, बाल शिवाजी स्कूल इत्यादी संस्थांद्वारे विविध ठिकाणी २००० झाडे लावण्याचे नियोजन केले आहे. तसेच ३० सप्टेंबर पर्यंत टप्याटप्प्याने झाडे लावून ही मोहीम चालू राहणार आहे.
ब्रिगे. सुधीर सावंत हे समृद्ध आणि आनंदी गाव प्रकल्पाचे जनक आहेत तसेच नैसर्गिक शेती चळवळीचे प्रणेते आहेत. समृद्ध आणि आनंदी जीवनासाठी निसर्गाचे संवर्धन काळाची गरज आहे. वृक्ष हवेतील कर्ब शोषून घेऊन हवा शुद्ध करण्याचे महान कार्य करतात. व मानवाला उपयुक्त असणारा ऑक्सिजन निर्माण करतात. म्हणून “झाडे जगवा जीवन जगवा” हा नारा ब्रिगे. सुधीर सावंत यांनी जनतेला दिला आहे. निसर्गाचे संवर्धन कारणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. म्हणून प्रत्येकाने एक तरी झाड लावून त्याचे संवर्धन करावे व वृक्ष लागवड अभियानामध्ये उत्सुर्फुर्तपणे भाग घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.