⚡मालवण ता.२३-: श्री शिवाजी विद्यामंदिर काळसे आणि स्व. सौ. जयश्री वामन प्रभु कनिष्ठ महाविद्यालयाच्या दहावी आणि बारावी बॅचचा निकाल सातत्याने १०० टक्के लावून आपल्या मुख्याध्यापक पदाच्या कारकिर्दीत काळसे हायस्कूलला प्रगतीपथावर नेण्यामध्ये श्री. किशोर वालावलकर सर यांचे बहुमोल योगदान आहे. “असे प्रतिपादन काळसे धामापूर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, सी. ए. श्री हेमंत परब यांनी काळसे हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. किशोर वालावलकर यांच्या सेवानिवृत्तीपर सत्कार कार्यक्रम प्रसंगी बोलताना केले.
मालवण तालुक्यातील श्री शिवाजी विद्यामंदिर काळसे व स्व. सौ. जयश्री वामन प्रभु कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक, श्री किशोर वालावलकर हे ३६ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्याबद्दल त्यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार आणि शुभेच्छा समारंभ संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी सेवानिवृत्त मुख्याध्यापक, श्री. किशोर वालावलकर सर यांचा आणि सौ. अनुजा वालावलकर यांचा सत्कार संस्थेच्या तसेच शिक्षकवृंदांच्या वतीने शाल व श्रीफळ देवून करण्यात आला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष, श्री. हेमंत परब यांच्यासह प्रमुख पाहुणे म्हणून बॅरिस्टर नाथ पै हायस्कूल कुडाळचे माजी मुख्याध्यापक, श्री. अशोक येजरे सर, संस्थेचे उपाध्यक्ष, श्री. योगेश राऊळ, सचिव श्री. केशव सावंत, सह सचिव श्री. गजानन प्रभु, खजिनदार श्री. दाजी परब , संचालक तथा माजी विद्यार्थी सेवा संस्थेचे अध्यक्ष व माजी उपजिल्हाधिकारी, श्री विनोद गोसावी , संचालक व सेवानिवृत्त तहसीलदार, श्री. शरद गोसावी, संचालक श्री. राजन प्रभु, माजी संचालक श्री. सुवर्णा काळसेकर , श्री म्हापणकर , बाळकृष्ण परब, विद्यमान मुख्याध्यापक श्री. तुकाराम पेडणेकर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
