Headlines

रेशनवरील धान्य वितरणात पूर्वीप्रमाणे ४ किलो तांदूळ, १ किलो गहू द्या

कोकणातील नागरिकांच्या आहारपद्धतीचा विचार करण्याची सुशांत नाईक यांची मागणी

कणकवली : शासनामार्फत शिधापत्रिकाधारकांना देण्यात येणाऱ्या रेशनच्या धान्याच्या प्रमाणात सध्या करण्यात आलेल्या बदलामुळे कोकणातील नागरिकांच्या अडचणी वाढत असल्याचा मुद्दा उपस्थित करत, पूर्वीप्रमाणे प्रत्येकी ४ किलो तांदूळ आणि १ किलो गहू देण्यात यावा, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कणकवली विधानसभा प्रमुख तथा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केली आहे. याबाबत त्यांनी कणकवलीचे प्रांताधिकारी जगदीश कातकर यांच्याकडे निवेदन देऊन शासनाचे लक्ष वेधले आहे.

शिधापत्रिकाधारकांना रेशन दुकानातून प्रतिमाणशी एकूण ५ किलो धान्य दिले जाते. यापूर्वी या पाच किलो धान्यामध्ये ४ किलो तांदूळ आणि १ किलो गहू असा समावेश होता. मात्र सध्या धान्य वितरणाच्या प्रमाणात बदल करण्यात आला असून, ३ किलो तांदूळ आणि २ किलो गहू प्रतिमाणशी दिला जात असल्याचे सुशांत नाईक यांनी निवेदनात नमूद केले आहे.

कोकणातील नागरिकांच्या पारंपरिक आहारपद्धतीचा विचार करता तांदळाला विशेष महत्त्व आहे. कोकणामध्ये भात हे प्रमुख अन्न असून अनेक कुटुंबांच्या दैनंदिन आहारात तांदूळ, भात तसेच तांदळाची भाकरी यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळे रेशनच्या धान्यामध्ये तांदळाचे प्रमाण कमी करून गव्हाचे प्रमाण वाढविणे हे येथील नागरिकांच्या गरजांशी सुसंगत नसल्याचे नाईक यांनी म्हटले आहे.

कोकणातील भौगोलिक परिस्थिती, स्थानिक शेती आणि पारंपरिक खाद्यसंस्कृती लक्षात घेऊन धान्य वितरणाचे प्रमाण निश्चित करणे आवश्यक आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली. शासनाच्या धान्य वितरण योजनेचा उद्देश गरजू शिधापत्रिकाधारकांना त्यांच्या गरजेनुसार अन्नधान्य उपलब्ध करून देणे हा आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या आहाराच्या गरजा लक्षात घेऊन तांदळाचे प्रमाण पूर्ववत करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

सध्या अनेक शिधापत्रिकाधारकांना रेशन दुकानातून मिळणाऱ्या धान्यामध्ये तांदळाचे प्रमाण कमी आणि गव्हाचे प्रमाण अधिक असल्याने त्यांना अपेक्षित प्रमाणात तांदूळ मिळत नसल्याची भावना आहे. विशेषतः तांदूळ हा दैनंदिन आहाराचा महत्त्वाचा भाग असलेल्या कोकणातील कुटुंबांसाठी हा बदल अडचणीचा ठरत असल्याचे नाईक यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.

त्यामुळे शासनमान्य स्वस्त धान्य दुकानांमधून शिधापत्रिकाधारकांना पूर्वीप्रमाणे प्रतिमाणशी ४ किलो तांदूळ आणि १ किलो गहू, असे एकूण ५ किलो धान्य देण्यात यावे, अशी ठोस मागणी सुशांत नाईक यांनी केली आहे. याबाबत शासनाने सकारात्मक निर्णय घेऊन कोकणातील नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

सुशांत नाईक यांच्या या मागणीमुळे रेशनवरील धान्य वितरणाच्या प्रमाणाचा आणि कोकणातील स्थानिक आहारपद्धतीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून, शासन याबाबत कोणता निर्णय घेते याकडे शिधापत्रिकाधारकांचे लक्ष लागले आहे.

यावेळी कणकवली तालुकाप्रमुख राजू राठोड, नगरसेवक संकेत नाईक, नगरसेवक जयेश धुमाळे, माजी युवासेना जिल्हाप्रमुख अॅड. हर्षद गावडे, उपतालुकाप्रमुख चेतन हुले, रुपेश आमडोसकर,महिला तालुकाप्रमुख माधवी दळवी, महिला तालुका प्रमुख वैदही गुडेकर, विभाग प्रमुख विलास गुडेकर, उपतालुकाप्रमुख राजू राणे, राजू शेटये, विभाग प्रमुख बाळा राऊत, विभाग प्रमुख तात्या निकम, विभाग प्रमुख सिद्धेश राणे, विभाग प्रमुख बबली राणे, विभाग प्रमुख गुरुनाथ पेडणेकर, तेजस राणे दिव्य साळगावकर, रोहिणी पिळणकर, संजना कोलते, अवि सावंत, हर्षद गावडे, विठोबा मर्ये, संदीप गावकर,उपस्थित होते.

You cannot copy content of this page