जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे निर्देश; जिल्ह्यात १० हजार वनराई बंधारे, प्रत्येक ग्रामपंचायतीला २५ जलतारा उभारणी उद्दिष्टपूर्तीसाठी घेतला आढावा

सिंधुदुर्ग, दि. २९ (जिमाका) : जिल्ह्यात निर्माण झालेली दुष्काळसदृश्य परिस्थिती आणि आगामी काळातील पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेऊन जलपुनर्भरण, पाणीसाठा निर्मिती आणि पाणी बचतीच्या उपाययोजनांना गती देण्यासाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या कालावधीत जिल्ह्यात १० हजार वनराई बंधारे उभारण्याचे तसेच प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये २५ जलतारा निर्माण करण्याचे उद्दिष्ट पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चित करण्यात आले आहे. ही कामे जास्तीत जास्त लोकसहभागातून प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले.
जिल्ह्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीचा ट्रिगर-१ मध्ये समावेश झाल्याच्या पार्श्वभूमीवर टंचाई निवारणासाठी करावयाच्या उपाययोजनांच्या नियोजनाबाबत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयातील तरिणी सभागृहात बैठक झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर, उपवनसंरक्षक मिलीश शर्मा, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले, मनोज भोगटे, ग्रामीण पाणीपुरवठा व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता तसेच विविध समन्वय यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीस सहभागी झाले.
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सांगितले की, जलतारा आणि वनराई बंधारे उभारणीची कामे मोहीम स्वरूपात राबवून त्यांना गती द्यावी. लोकसहभागाच्या माध्यमातून जास्तीत जास्त कामे पूर्ण करावीत. सध्याची परिस्थिती लक्षात घेता गावपातळीपासून जिल्हास्तरापर्यंत सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून जलसंधारणाच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी सनियंत्रण अधिकारी नियुक्त करून अभियानाच्या कामांना गती देण्याची सूचना केली. जिल्ह्यातील अस्तित्वात असलेल्या सिमेंट बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्यासाठी आवश्यक अंदाजपत्रके व इस्टिमेट तयार करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. दुरुस्तीची कामे पूर्ण होईपर्यंत आवश्यकतेनुसार तात्पुरत्या उपाययोजना करून संबंधित बंधारे पाणी साठवणुकीसाठी उपयोगात आणता येतील का, याची कार्यवाही करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
२ ऑक्टोबरची ग्रामसभा ठरणार महत्त्वाची
येत्या २ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ग्रामसभांमध्ये गावातील टंचाई परिस्थितीवर सविस्तर चर्चा करून आवश्यक उपाययोजनांचे नियोजन करण्याच्या सूचना गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. तसेच व्हीबी-जी रामजी योजनेअंतर्गत आवश्यक कामांबाबत चर्चा करून मंजुरीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. आगामी टंचाईची संभाव्य स्थिती लक्षात घेऊन प्रत्येक गावाने स्थानिक गरजेनुसार जलसंधारण आणि पाणी उपलब्धतेचे नियोजन करणे आवश्यक असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
जिल्हा परिषदेकडून तयार करण्यात येणाऱ्या टंचाई आराखड्यात जलस्रोत बळकटीकरणाच्या कामांना प्राधान्य देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. वनविभागामार्फत सुरू असलेल्या बंधारे निर्मितीच्या कामांचा आढावाही बैठकीत घेण्यात आला. उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांनी याबाबत माहिती दिली. डोंगरमाथ्यावरील भागात जास्तीत जास्त वनराई बंधारे उभारण्याबरोबरच यापूर्वी उभारण्यात आलेल्या वनराई बंधाऱ्यांमधील गाळ व माती काढून त्यांची पाणी साठवण क्षमता वाढविण्याच्या सूचना करण्यात आल्या. वन्यजीवांसाठी उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धता राहावी यासाठी नवीन जलस्रोत निर्माण करण्याबरोबरच अस्तित्वातील स्रोतांचे बळकटीकरण करण्यावरही भर देण्यात आला.
जिल्ह्यातील सर्व जलस्रोत, पाणीसाठे व जलसाठ्यांची सद्यस्थिती दर्शविणारी आकडेवारी संबंधित विभागांनी दैनंदिन स्वरूपात एकत्रित करून उपलब्ध करून द्यावी, अशा सूचनाही बैठकीत देण्यात आल्या. जलसंधारणाची कामे, लोकसहभाग आणि उपलब्ध जलस्रोतांचा प्रभावी वापर यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.
००००००
