Headlines

कणकवलीत उड्डाणपुलाखालील भाजी, फुले, फळ विक्रेत्यांचे स्थलांतर

नगरपंचायतीने निश्चित केलेल्या जागेत विक्रेत्यांनी थाटली दुकाने

कणकवली : शहरातील उड्डाणपुलाखाली तसेच रस्त्याच्या कडेला भाजीपाला, फुले व फळांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचे अखेर पर्यायी जागेत स्थलांतर सुरू झाले आहे. कणकवली नगरपंचायतीने विक्रेत्यांसाठी निश्चित केलेल्या जागेत विक्रेत्यांनी आपली दुकाने मांडण्यास सुरुवात केली आहे. कणकवली नगरपंचायत च्या वतीने मुख्य चौकातील त्या विक्रेते बसलेल्या जागेमध्ये ग्रीन नेट बांधून संपूर्ण बंद केले आहे.

कणकवली उड्डाणपुलाखाली आणि रस्त्यालगत अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांमुळे अनेकदा वाहतूक कोंडी होत होती. तसेच पादचाऱ्यांना ये-जा करताना अडथळ्यांचा सामना करावा लागत होता. याबाबत नागरिकांकडून तक्रारीही करण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर नगरपंचायतीने विक्रेत्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देत तेथे व्यवसाय करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

गणेश चतुर्थीच्या काळात शहरात नागरिकांची तसेच वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्याने उत्सव काळात कारवाई न करता चतुर्थीनंतर उड्डाणपुलाखालील विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा नगरपंचायतीकडून देण्यात आला होता. त्यानंतर विक्रेत्यांनीही नगरपंचायतीने निश्चित केलेल्या जागेत स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे.

विक्रेत्यांच्या स्थलांतरामुळे उड्डाणपुलाखालील रस्त्याचा परिसर अधिक मोकळा होण्यास मदत होणार आहे. वाहतूक कोंडीचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्याची शक्यता आहे. तसेच पादचाऱ्यांसाठीही मार्ग मोकळा होणार आहे. नगरपंचायतीच्या या निर्णयाची अंमलबजावणी झाल्याने शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

You cannot copy content of this page