डी. के. सावंत यांचा महसूल अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे इशारा
*💫सावंतवाडी दि.१९-:* नगर रचनाकार भ्रष्टाचार विरोधात २६ जानेवारी रोजी महसूल कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण छेडणार असल्याचा इशारा माजगाव येथील डी. के. सावंत यांनी उपविभागीय महसूल अधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला. निवेदनात सावंत यांनी म्हटले की, नगर रचनाकार काकड, चं. पं. जोशी, पु. ला. कदम, सहाय्यक नगर रचनाकार रा. दी मठपती यांनी आपल्या निवृत्तीपूर्व साधारण सहा महिन्यातील कालावधीत संमत केलेल्या प्रस्तावांची संख्या पाहता त्यांची काम करण्याची क्षमता कित्येक पटींनी कशी वाढली याची सखोल चौकशी व्हावी. पु. ला. कदम हे तर निवृत्तीनंतर दोन महिने मागील तारीख टाकून प्रस्ताव पास करीत होते, त्याची खात्री करून त्यांच्यावर खटला दाखल करण्यात यावा. मुख्यमंत्र्यांकडे दाखल केलेल्या तक्रारीची दखल न घेता भ्रष्टाचारात सहकार्य करणाºया भुक्ते, सहाय्यक संचालक यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी सावंत यांनी केली. या नगररचनाकारांचे दलाल हे आर्किटेक्ट, इंजिनीअर असे अनुभवी मध्यस्थ दलाल असल्याने लाचलुचपत विभागाच्या टप्प्यात येण्यात अडचणी येतात. तसेच त्यांना भ्रष्टाचार करण्यात वरिष्ठ अधिकाºयांचे समर्थन व सहभाग आहे. यासाठी त्यांनी संमत केलेल्या प्रस्तावाची मायक्रो आॅडिट करणे गरजेचे आहे जेणेकरून त्यांनी केलेला भ्रष्टाचार उघड होऊ शकतो. तसेच काकड यांना पाच लाख रुपये लाच स्वीकारताना लाचलुचपत खात्याच्या अधिकाºयांनी पकडले त्यांचे पुढे काय झाले हेही जनतेस समजणे आवश्यक आहे. नगररचनाकार स्वत: भ्रष्टाचारात गुंतले असल्याने व ते स्वत: अपिली अधिकारी असल्याने माहिती अधिकारात माहिती दिली जात नाही. अपील थातूरमातूर कारणे दाखवून फेटाळली जातात. तसेच ग्रामपंचायतचे अधिकार पूर्ववत देण्यात यावेत व सर्वसामान्यांना महसूल व्यतिरिक्त अन्य कार्यालयात जावे लागू नये यासाठी ग्रामीण भागातील नगररचनाकार यांचा हस्तक्षेप त्वरित थांबवावा, अशी मागणीही सावंत यांनी केली. जिल्हाधिकारी हे जिल्ह्याचे सर्वेसर्वा असताना त्यांच्या अधिकारात तांत्रिक सल्ला देण्याचा नगररचनाकार यांचा हस्क्षेप पूर्णपणे काढून टाकण्यात यावा. नगररचनाकार यांचा ग्रामीण भागाच्या विकासात येणारा अडथळा व करोडो रुपयांचा भ्रष्टाचार ज्याचा शासनास काहीच फायदा नाही असा हा विभाग बंद करावा व शासनाचा पगार भत्ते यासाठी होणारा निधीचा अपव्यय टाळावा व त्या बदल्यात उच्चशिक्षित तांत्रिक कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयातच नेमण्यात यावे. या सर्व मागण्यांसाठी प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी रोजी आपल्या उपविभागीय महसूल कार्यालयासमोर सकाळी ८.३० वाजता असून लाक्षणिक उपोषण असल्याचा इशारा सावंत यांनी दिला आहे
