*माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्यासह माजी नगरसेवक विलास जाधव, अफरोज राजगुरू यांचा जाहीर पाठिंबा*
*💫सावंतवाडी दि.१९-:* बाजारपेठेतील स्टॉल हटवून पोटावर लाथ मारणाऱ्या पालिका प्रशासनाविरोधात सावंतवाडी येथील स्टॉल व्यवसायिक रवी जाधव यांनी येथील प्रांत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण पुकारले आहे. यावेळी त्यांनी जोपर्यंत आपणाला न्याय मिळत नाही तो पर्यंत माघार घेणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे. यावेळी त्यांनी नगरपालिका प्रशासनाला मारायचं असेल तर पाठीवर मारा, कोणाच्या पोटावर नको अशी विनवणी केली आहे. रवी जाधव यांच्या उपोषणाला माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी नगरसेवक विलास जाधव, माजी नगरसेविका अफरोज राजगुरू यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. यावेळी ते म्हणाले की, सणासुदीच्या काळात विक्रीसाठी आणलेले सामान कचरा गाडीतून नेण्यात आले असून, आपण दलित समाजातील असल्यानेच आपल्यावर अन्याय करण्यात आला असल्याचा आरोप रवी जाधव यांनी केला आहे. तो स्टॉल व ती जागा आपणाला कायम स्वरुपी व्यवसाय करण्यासाठी मिळावी यासाठी आपण प्रशासनाकडे मागणी देखील केली होती. परंतु पालिका प्रशासनाने त्यावर दुर्लक्ष केला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
