⚡मालवण ता.१४-: कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेला “कै.वामनराव दाते उत्कृष्ट कोमसाप शाखा पुरस्कार” पालघर येथे कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय महिला साहित्य संमेलनात प्रदान करण्यात आला.
कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवणच्या वतीने संस्थेचे आजीव क्रियाशील सदस्य आणि आचरे मतदारसंघाचे माजी जि.प. सदस्य ज्ञानदेव घनश्याम पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला. त्यांच्या सोबत कोमसाप सिंधुदुर्गचे अध्यक्ष मंगेश मसके, सिंधुदुर्ग कोषाध्यक्ष भरत गावडे, सिंधुदुर्ग महिला विभाग प्रमुख वृंदा कांबळी आदी सिंधुदुर्गातील कोमसाप पदाधिकारी उपस्थित होते. या पुरस्कार वितरण प्रसंगी व्यासपीठावर कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक मधु मंगेश कर्णिक, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू भालचंद्र मुणगेकर, ज्येष्ठ लेखिका मोनिका गजेंद्रगडकर, कोमसापच्या अध्यक्षा नमिता कीर, विश्वस्त रमेश किर, कार्याध्यक्ष डॉक्टर प्रदीप ढवळ आदी मान्यवर उपस्थित होते.
या पुरस्कार प्राप्ती नंतर बोलताना कोमसाप मालवणचे अध्यक्ष सुरेश शामराव ठाकूर म्हणाले, मानाचा समजला जाणारा कै. वामनराव दाते आदर्श शाखा पुरस्कार हा मालवणच्या सर्व ३०० क्रियाशील सभासदांचा आहे. गेली चार वर्षे सर्वांनी तन, मन आणि धन खर्च करून साहित्यिक विविध उपक्रम केलेत. कोरोना कालावधीतही ऑनलाइन उपक्रमांचा मालवण शाखेने विक्रम केला. या यशवंत प्रवासात रुजारिओ पिंटो, मंगेश मसके आदी अनेक पदाधिकारी व सहकाऱ्यांची साथ नेहमी लाभली. तसेच संस्थेचे संस्थापक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक मालवण शाखेचे ज्या ज्या वेळी कौतुक करतात, त्या त्या वेळी तो आमच्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार असतो,” असेही सुरेश ठाकूर म्हणाले. “कोमसाप मालवणला लाभलेला हा मानाचा पुरस्कार आपण कोमसाप मालवणचे हितचिंतक आणि थोर गझलकार आदरणीय मधुसूदन नानिवडेकर यांच्या पवित्र स्मृतीस अर्पण करीत आहोत, असेही ठाकूर म्हणाले.
