⚡मालवण ता.१४-:
ब्रिटिशकालीन जुन्या मापदंडामुळे रखडलेली मालवण तालुक्यातील खारभूमी योजनेंतर्गत असलेली बरीच कामे आता मार्गी लागणार आहेत. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे खासदार, पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून जुन्या मापदंडात सुधारणा करत निकष बदलण्यात आले आहेत. त्यामुळे या योजनेंतर्गतच्या कामांना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होणार असून पावसाळ्यानंतर या योजनेच्या कामांना सुरवात होईल, असे आमदार वैभव नाईक यांनी आज मालवण येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मालवण शिवसेना शाखेत आमदार नाईक यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, बाबी जोगी, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, मंदार केणी, महेंद्र म्हाडगुत, सन्मेष परब, तपस्वी मयेकर, सिद्धार्थ जाधव, नरेश हुले, स्वप्नील आचरेकर, भगवान लुडबे, प्रसाद आडवणकर, किसन मांजरेकर, यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी आमदार नाईक म्हणाले, खारभूमी योजनेंतर्गतची तालुक्यातील बरीच कामे ही जुन्या मापदंडामुळे रखडल्याने नवीन मापदंड करणे आवश्यक बनले होते. त्यानुसार मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या पाठपुराव्यानंतर मापदंड बदलण्यात आले आहेत. त्यानुसार तालुक्यातील खारभूमी योजनेंतर्गतच्या कामांसाठी ७० ते ८० कोटी रुपयांच्या कामांना मान्यता मिळणार असून ही कामे पावसाळ्यानंतर मार्गी लावली जातील.
तोक्ते वादळात किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे कोकण किनाऱ्यावर आदळणाऱ्या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी सुमारे ४०० कोटी रुपयांचे धूप प्रतिबंधक बंधाऱ्याच्या कामांचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे, असेही आम. नाईक म्हणाले.
मालवण न. प. निवडणुकीसाठी आम्हीं तयार- आम. नाईक
मालवण नगरपालिका निवडणुकीसाठी नगरसेवक पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे सर्व माजी नगरसेवक, शहरातील पदाधिकारी आम्ही या निवडणुकीसाठी तयार आहोत. गेल्या पाच वर्षांच्या काळात शहरातील विविध विकासकामे मार्गी लावण्यात आली आहेत. शहरातील रेवतळे येथे नगरपालिकेच्या माध्यमातून साकारल्या जाणाऱ्या मत्स्यालय प्रकल्पासाठी आवश्यक २५ गुंठे जागेचे मूल्य ठरविण्यासाठी तसेच पुढील प्रक्रिया करण्यासाठी प्रांतांची नियुक्ती करण्यात आली आहे. या जागेसाठी आवश्यक ती तडजोड ही शासनच करणार असल्याचे आमदार नाईक यांनी स्पष्ट केले.
