कणकवली नगरसेवक कन्हैया पारकर यांचा आरोप
⚡कणकवली ता.१३-:
कणकवलीतील श्रीधर नाईक उद्यानाचे उदघाटन हे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते करणे हे नैतिकतेला धरून असणार नाही. कारण श्रीधर नाईक खून खटल्यात तेव्हा नारायण राणें आरोपी होते. राणेंच्या हस्ते श्रीधर नाईक उद्यानाचे उदघाटन करणे म्हणजे जिल्ह्यात दहशतवादाचे उदात्तीकरण करण्यासारख्या प्रकार आहे असा आरोप नगरसेवक कन्हैया पारकर यांनी केला.
कणकवली येथे पत्रकार परिषदेत बोलताना कन्हैया पारकर यांनी कै. श्रीधर नाईक उद्यानाचे उदघाटन पालकमंत्री उदय सामंत, माजी आमदार प्रमोद जठार, अथवा कै . श्रीधर नाईक यांची पत्नी शमा नाईक यांच्या हस्ते केले तरी चालेल अशी भूमिका स्पष्ट केली.
गुंडगिरी , दहशतवादविरोधात लढणाऱ्या श्रीधर नाईक यांची हत्या 22 जून 1991 रोजी कणकवलीत झाली होती. श्रीधर नाईक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कै . श्रीधर नाईक उद्यान कणकवलीत बांधण्यात आले. 22 जून 2022 रोजी नूतनीकरण करण्यात आलेल्या कै. श्रीधर नाईक उद्यानाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. त्याबद्दल नगराध्यक्ष नलावडे उपनगराध्यक्ष हर्णे यांचे अभिनंदन करतो. असे सांगतानाच श्रीधर नाईक हत्येच्या खटल्यात तेव्हाचे आरोपी असलेले विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते कै. श्रीधर नाईक उद्यानाचे उदघाटन करू नये असे नगरसेवक कन्हैया पारकर यांनी सांगितले. श्रीधर नाईक खून खटल्यातील शिक्षा झालेले काही आरोपी आजही केंद्रीयमंत्री नारायण राणेंकडे काम करतात. लोकप्रतिनिधी म्हणून राणेंनी उदघाटनास उपस्थित रहावे. तेव्हा नारायण राणे असलेल्या काँग्रेस पक्षात आम्ही पक्षप्रवेश केला ही आमची राजकीय घोडचूक होती याची कबुली श्री पारकर यांनी दिली. राणेंची साथ सोडून आम्ही भाजपात दाखल झालो, मात्र राणे भाजपात आल्यानंतर आम्ही तात्काळ भाजपा मधून बाहेर पडलो व शिवसेनेत गेल्याचेही श्री पारकर यांनी सांगितले. तसेच या उद्यानाच्या कामाकरिता निधी मंजूर होण्यासाठी संदेश पारकर, सुशांत नाईक यांनी पाठपुरावा केला. नगरपंचायत कडून या संदर्भातील ठराव घेतला. असेही कन्हैया पारकर यांनी सांगितले.
