संदेश पारकर : कणकवलीत व्यसनमुक्तीपर जनजागृती कार्यक्रम..
⚡कणकवली ता.१०-: व्यसन ही समाजाला लागलेली कीड आहे. या कीडीचा बीमोड करण्यासाठी नशामुक्ती मंडळांसह व्यसनमुक्ती विविध संघटनांना काम करीत आहेत. त्यांचे हे सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांसह तरुण पिढीने व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे. नशामुक्ती मंडळाच्या व्यसनमुक्ती अभियानात तरुण पिढीने सहभागी होऊन व्यसनांच्या आहारी गेलेल्यांना प्ररावृत्त करण्याचे कार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केले.
कोकणचे गांधी आप्पासाहेब पटवर्धन यांच्या ५५ व्या स्मृतिदिनानिमित्त नशामुक्त भारत अभियानांतर्गत नशामुक्ती मंडळ, गोपुरी आश्रम, नगरपंचायत, विद्यामंदिर प्रशालेच्या सहकार्याने आप्पासाहेब पटवर्धन चौक येथे ‘होलिकेला नमन, करूया व्यसनांचे दहन’ या टॅगलाईनखाली व्यसनमुक्तीपर जनजागृती कार्यक्रम आयोजित केला होता. याप्रसंगी श्री. पारकर बोलत होते. यावेळी नगरपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी अमोल अघम, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र नाणचे, गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र मुंबरकर, नशामुक्ती मंडळाच्या जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर, गोपुरीचे सचिव विनायक उर्फ बाळू मेस्त्री, विनायक सापळे, सदाशिव राणे, नगरपंचायतीचे प्रकल्प अधिकारी अमोल भोगले, महानंदा चव्हाण, विद्यामंदिरचे शिक्षक प्रसाद राणे, कनक सिंधू शहर संघ कणकवलीच्या अध्यक्ष प्रिया सरुडकर, सचिव रंजिता परब, मिलन चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रा. राजेंद्र मुंबरकर म्हणाले, तरुण पिढीमध्ये व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढत आहे. ही बाब चिंताजनक आहे. तरुण पिढी अमलीपदार्थांच्या आहारी जात आहे, हे कुटुंब व समाजासाठी घातक आहे. तरुण पिढीला व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी त्यांना मानसिकदृष्टया स्टॉग बनविले पाहिजे. शालेय स्तरावर व्यसनमुक्तीपर जनजागृतीचे कार्यक्रम झाले पाहिजे. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांंमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती होऊन हे विद्यार्थी कुटुंबात व समाजात व्यापक स्वरुपात व्यसनमुक्तीचे कार्य करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी उपस्थितांनी व्यसनमुक्तीपर मार्गदर्शन व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी पोस्टरच्या माध्यमातून व्यसनमुक्तीबाबत जनजागृती केली. त्यानंतर प्रसाद राणे यांनी उपस्थितांनी व्यसनांपासून दूर राहण्याची शपथ दिली. त्यानंतर कागदावर रेखाटलेल्या व्यसनांच्या चित्रांचे विद्यार्थी व नागरिकांनी दहन करून होलिकेला नमन, करूया व्यसनांचे दहन असा संकल्प केला. आरंभी आप्पासाहेब पटवर्धन यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सूत्रसंचालन विद्या घाणेकर यांनी केले. आभार अमोल भोगले यांनी मानले. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, कोकणचे गांधी आप्पासाहेब पटवर्धन यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या व्यसनमुक्तीपर कार्याचा वसा पुढे नेण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आला होता.
फोटो
