कमी केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घ्या

मेडिकल कॉलेज अन्यत्र हलवा:
अन्यथा आमरण उपोषण;भाजपची प्रशासनाला १५ जूनची डेटलाईन

ओरोस-:

जिल्हा सामान्य रुग्णालयातील एन एच एम अंतर्गत कर्मचाऱ्यांना सेवेत पूर्ववत सामावून घेण्यात यावे. तसेच सामान्य रुग्णालयाच्या ठिकाणी सुरू असलेले वैद्यकीय महाविद्यालय अन्यत्र हलवण्यात यावे, अन्यथा १५ जून नंतर भारतीय जनता पार्टी नागरिकांना घेवून व कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना घेवून आमरण उपोषणास बसेल, असा इशारा भाजपाचे ओरोस मंडळ अध्यक्ष दादा साईल, यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील यांना बुधवारी दिले आहे.


याबाबत देण्यात आलेल्या निवेदनात, जिल्हा सामान्य रुग्णालय, सिंधुदुर्ग हे आयुक्त आरोग्य सेवा व अभियान संचालक  यांच्याकडून सिंधुदुर्ग  वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरण करण्यात आल्याने राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत तथा जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या अधिनस्त असलेल्या एन एच एम अंतर्गत कार्यरत कंत्राटी विशेष तज्ञ, वैद्यकीय अधिकारी, पॅरामेडिकल स्टाफ व इतर कर्मचारी वर्ग मिळून सुमारे ३०० कर्मचाऱ्यांना तडकाफडकी कमी करण्याचे पत्र प्राप्त झाल्याचे समजले आहे.
मुळातच जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या ठिकाणी वैद्यकीय शिक्षण विभागाचे महाविद्यालय सुरू करणे हा ‘उंटावरून शेळ्या हाकण्याचा’ अगम्य प्रकार आहे. या वैद्यकीय महाविद्यालयासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात अन्यत्र शासकीय जमिनीत व्यवस्था करण्या ऐवजी जिल्हा सामान्य रुग्णालयातील सेवा बंद करून त्या ठिकाणी हे कॉलेज सुरू करण्याचा महाभयंकर प्रताप का करण्यात आला ? याचे उत्तर अजूनही सापडत नाही. मुळात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य सेवा ही नाममात्र स्वरूपाची आहे. ती सुधारण्याऐवजी जर जिल्हा सामान्य रुग्णालयातील सेवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या नावाखाली बंद करण्याचा घाट प्रशासनाने घातला असेल तर त्याला आमचा ठाम विरोध आहे.
त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयाच्या नावाखाली फक्त राजकिय स्वार्थासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातील जुन्या इमारती, कर्मचारी त्याचप्रमाणे इतर सेवा या वैद्यकीय शिक्षण विभागाकडे सुपूर्द केल्याचे समजते. त्याच प्रमाणे शेजारी असलेल्या आयटीआय मधील काही इमारती आणि होस्टेल देखील या वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरित केल्याचे समजते.
तसेच जिल्हा रुग्णालयातील एनएचएम मधील कर्मचाऱ्यांना देखील तडकाफडकी कमी केले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील सेवा बंद करून जिल्ह्यातील सर्वसामान्य लोकांच्या आरोग्याशी आणि जीविताशी खेळण्याचा अधिकार प्रशासनाला कोणी दिला ? याचे उत्तर प्रशासनाला येत्या काळात जिल्हा वासीयांना द्यावे लागणार आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वैद्यकीय महाविद्यालयामुळे येत्या काळात वैद्यकीय सेवा कोलमडल्यामुळे जर रुग्णांना जीव गमवावा लागला तर त्याला पूर्णपणे आपले प्रशासन जबाबदार असेल याची देखील गंभीर नोंद घ्यावी, असाही इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.
त्यामुळे हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तात्काळ अन्य शासकीय जागेत हलवून जिल्हा सामान्य रुग्णालय पूर्वीप्रमाणे सुरळीत करण्यात यावे. तसेच एनएचएम मधील कार्यरत असणाऱ्या सुमारे ३०० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तात्काळ सेवेत पूर्ववत करण्यात यावे. अन्यथा येत्या 15 जून नंतर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही नागरिक आणि या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांसह आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसू याची गंभीर नोंद घ्यावी, असे नमूद करण्यात आले आहे. यावेळी देवेन सामंत, माजी पंचायत समिती सदस्या सुप्रिया वालावलकर उपस्थित होत्या.

You cannot copy content of this page