*💫मालवण दि.१६-:* श्री रामजन्मभूमी मंदिर तीर्थक्षेत्र न्यास अयोध्या न्यासच्या माध्यमातून अयोध्या येथे भव्य श्री राममंदिर निर्माण कार्य सुरु झाले आहे. या राममंदिर निर्माणासाठी देशातील प्रत्येक व्यक्तीचा सहभाग लाभावा यासाठी १५ जानेवारी ते १५ फेब्रुबारी या कालावधीत श्री राममंदिर निधी समर्पण अभियान राबविले जात आहे. यासाठी मालवणा येथील रांगोळी महाराज मठमध्ये मालवण तालुक्यातील अभियानाची सुरुवात करण्यात आली. याचा शुभारंभ शुक्रवारी तालुका संघचालक अॅड. समीर गवाणकर यांच्या हस्ते भारतमाता व श्री राम यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा सहकार्यवाह पवन बांदेकर, अभियानाचे तालुका प्रमुख सुनील धुरी, डॉ. अश्विन दिघे, श्रीधर काळे, रत्नाकर कोळंबकर, गणेश कुशे आदी मंडळी उपस्थित होती. यावेळी बोलताना डॉ. अश्विन दिघे म्हणाले की, आपल्या देशावर आक्रमणाचा इतिहास इसवी सन ५०० पासून सुरू होतो. मात्र सुरुवातीच्या लढाया आक्रमणे ही युद्धभूमी पर्यंत मर्यादित होती. मात्र मुघल आक्रमण घराघरापर्यंत पोचले लुटमार, मंदिरांची नासधूस, महिलांवरील अत्याचार अशी काळी बाजू या अक्रमणांना होती. याच विकृत मनोरुत्तितून बाबराने आयोध्या येथील श्री राममंदिर पाडले. हे राम मंदिर पुनर्स्थापनेसाठी तब्बल ७६ लढाया झाल्या यामध्ये लाखो राम भक्तांना आपले प्राण अर्पण करावे लागले. हे प्राणार्पण पारतंत्र्यात झाले असे नाही तर स्वातंत्र्य काळातही राम जन्मभूमी मुक्तीसाठी राम भक्तांना आपल्या प्राणांचे त्याग करावे लागले. १९९० मधील कारसेवेमध्ये राम भक्तांना गोळ्या घालून मारण्यात आले. मात्र १९९२ मध्ये राम भक्तांनी अयोध्येतील तो ढाच्या जमीनदोस्त केला आणि शेकडो वर्षांचा हिंदू समाजावरील कलंक पुसून टाकला. आता प्रत्यक्ष श्रीराम प्रभुंच्या जन्मभूमीत भव्य मंदिर होत आहे. होणारे हे भव्य मंदिर राष्ट्रमंदिर व्हावे यासाठी संतांचा प्रयत्न आहे आणि यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचे आहेत. व्यापक जनसंपर्क करून देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचण्याचा या अभियानाच्या माध्यमातून निश्चय केला आहे. आपणही सर्वजण मालवण तालुक्यातील प्रत्येक घरापर्यंत सर्व विसरून केवळ श्रीमान राम मंदिर तीर्थक्षेत्र अयोध्या न्यासाचे कार्यकर्ते आहोत या भावनेने सर्वांत पर्यंत पोहोचूया आणि हे अभियान यशस्वी करूया, असे आवाहन केले आहे.
मालवणमध्ये राममंदिर निधी समर्पण अभियान….
