सतीश सावंत यांनी केली पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे मागणी
कणकवली ता.२८-:* कणकवली तालुक्यातील हरकुळ लघु पाटबंधारे. योजना येथे शेतीसाठी नवीन पाईपलाईन देण्यात यावेत अशी मागणी सिंधुदूर्ग जिल्हा बँकचे माजी अध्यक्ष सतिश सावंत यांनी पालकमंत्री ना.उदय सामंत यांच्याकडे केली आहे. या निवेदनात सतीश सावंत म्हणतात,कणकवली तालुक्यातील हरकुळ लघु पाटबंधारे तलाव हरकुळ गावामध्ये स्थानिक नाल्यावर सन 1976 मध्ये बांधणेत आला आहे.
सदर तलावाचा एकूण पाणीसाठा 2.652 द.ल.घ.मी असून माती धरणाची लांबी 240 मी. आहे. तलावाचे लाभक्षेत्र 106 हेक्टर आहे. सदर तलावाचा उजवा कालवा 2.50 कि. मी. व डावा कालवा 3 कि. मी. लांबीचा असून पाटबंधारे विभागामार्फत (कडा) सन 1993-94 मध्ये कालव्यामध्ये आर. सी. सी. पाईप (सिमेंटची पाईप) व लाभक्षेत्रात पी. व्ही. सी पाईपचे काम करणेत आले आहे. सन 1994 ते 2003 पर्यंत पाईप लाईन मधून शेतीसाठी व्यवस्थित पाणी पुरवठा होत होता परंतु त्यानंतर कालव्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांची मुळे सिमेंट पाईपच्या सांध्यातून पाईपमध्ये जावून पाईप चोकअप होऊ लागली व पाईपला गळती लागली. त्यामुळे पाईपमधून अपेक्षित प्रेशरने शेतीला पाणी पुरवठा मिळत नाही व प्रत्येक वर्षी पिकाखालील क्षेत्र कमी होत गेले.
सद्यस्थितीत 25 हेक्टर पर्यंत पिकाखालील क्षेत्र आहे. सिमेंट पाईप उजव्या कालव्यामध्ये 2.50 कि. मी. व डाव्या कालव्यामध्ये 3 कि. मी. लांबीची असून शेवटपर्यंत पाणी जात नाही. तसेच लाभक्षेत्रातील पी. व्ही. सी पाईप काही ठिकाणी चोकअप व खराब झाली आहे, व पाईपला गळती आहे. स्लुईस व्हॅाल्व नादुरुस्त आहेत. या सर्व कारणांमुळे शेतीला व पिण्यासाठी पुरेसे पाणी मिळत नाही, यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. कालव्यातील सिमेंटच्या पाईप ऐवजी झाडांची मुळे जाणार नाहीत व गळती होणार नाही अशी एच.डी.पी.ई. पाईप घालावी व पी. व्ही. सी पाईप लाईन व व्हॅाल्व यांची दुरूस्ती करणेत यावी अशा प्रकारची आग्रहाची मागणी हरकुळ येथील ग्रामस्थांची आहे.
पाटबंधारे विभागाच्या कायद्यान्वये, महाराष्ट्र सिंचन पध्दतीचे शेतकऱ्याकडून व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत हरकुळ ल. पा. तलावावर नोव्हेंबर 2006 मध्ये पाणी वापर संस्था स्थापन झालेली आहे. कालव्यातील 30 वर्षापूर्वीची जूनी 5 कि. मी. लांबीतील सिमेंटची पाईप लाईन काढून त्याठिकाणी एच्. डी. पी. ई., पी. व्ही. सी. पाईप लाईन करणे व लाभक्षेत्रातील पी. व्ही. सी पाईप लाईन, स्लुईस व्हॅाल्व यांची दुरूस्ती करणे आवश्यक आहे. कालवा दुरूस्तीची कामे झालेनंतर 106 हेक्टर क्षेत्र लागवडीखाली येणार आहे. तसेच शेतीसाठी व पिण्यासाठी विहीरींना पुरेसे पाणी मिळू शकणार आहे.
तरी हरकुळ ल. पा. योजना, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग येथे शेतीसाठी नवीन पाईपलाईनचे काम मंजूर करण्यासाठी।जलसंपदामंत्री ना.जयंत पाटील यांना शिफारस व्हावी, अशी मागणी सतीश सावंत यांनी केली आहे.
