यू डायस प्लस मध्ये सिंधुदुर्ग प्राथमिक शिक्षण विभाग प्रथम

सलग चौथ्या वर्षी मारली बाजी शिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांची माहिती

ओरोस ता.२७-:* भारत सरकारच्या विविध योजना राबविण्यासाठी आवश्यक माहिती प्राप्त होण्यासाठी “यु डायस प्लस” ही ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. जिल्हयातील शाळांची यात ऑनलाईन संगणकीकृत माहिती भरण्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात सलग चौथ्या वर्षी राज्यात अव्वल राहिला आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांनी दिली.

2018-19 पासून 2021-22 पर्यंत सलग चौथ्या वर्षी प्रणाली द्वारे माहिती भरण्यात जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. “यु – डायस प्लस” प्रणाली मध्ये ऑनलाईन भरलेली माहिती शाळांनी प्रमाणित करणे आवश्यक असते. हि ऑनलाईन भरलेली माहिती प्रमाणित करण्यामध्येही सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात पुन्हा अव्वल ठरेल, असाही विश्वास शिक्षणाधिकारी धोत्रे यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान हि माहिती भरण्याची सुविधा अजून पोर्टलला सुरु झाली नाही. ती लवकरच सुरु होईल, असे त्यांनी सांगितले.

राज्यातील सर्व शाळांची माहिती “यु – डायस प्लस” या ऑनलाईन प्रणालीद्वारे संगणकीकृत करण्यात येते . या माहितीचा उपयोग भारत सरकारच्या शालेय शिक्षण विभाग, शिष्यवृत्ती विभाग, आदिवासी विभाग, सामाजिक न्याय विभाग, महिला व बाल कल्याण विभाग, मध्यान्ह भोजन योजना या विभागातील योजना राबविताना केला जातो. राज्य कार्यालयाने “यु डायस प्लस” ची भरलेली ऑनलाईन माहिती शाळांनी 15 मे 2022 पर्यंत भरणे बाबत कळविले होते. 24 मे 2022 पर्यंत जिल्हयातील 98 टक्के शाळांची “यु डायस प्लस” ची ऑनलाईन माहिती भरण्याची कार्यवाही पूर्ण झाली होती. त्यानंतर शिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांनी उर्वरित शाळांना दोन दिवसात माहिती भरण्याची कार्यवाही पूर्ण करण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनास प्रतिसाद देवून उर्वरित 2 टक्के शाळांनी कार्यवाही पूर्ण केली व राज्यात पुन्हा एकदा 100 टक्के काम पूर्ण करून सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.

यासाठी जिल्हा परिषद प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन महत्वाचे ठरले, असे धोत्रे यांनी सांगितले. याकरिता संगणक प्रोग्रामर शत्रुघ्न चव्हाण, समग्र शिक्षाचे सर्व तालुक्यांचे डाटा एंट्री ऑपरेटर व एम.आय.एस.को. ऑर्डिनेटर, विशेषतज्ञ, विशेष शिक्षक तसेच सर्व शाळांचे शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, गटसमन्वयक, विस्तार अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांचे योगदान लाभल्याने शिक्षणाधिकारी धोत्रे यांनी अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page