पर्यटन महोत्सव हायजॅक करून शिवसेनेकडून नगरपालिकेच्या आणि जनतेच्या पैशांची लूट – सुदेश आचरेकर

मालवण ता.१९-:* स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अडवून ठेवून त्यांना सरकारच्या अधिपत्याखाली घेऊन आमदार, मंत्री यांच्या माध्यमातून त्यांच्यावर नियंत्रण ठेवून प्रशासनावर दबाव आणून लूट करण्याचे षडयंत्र राज्यातील महाविकास आघाडी सरकारने रचले आहे. याच धर्तीवर मालवण दांडी बीच येथे मालवण नगरपालिकेने आयोजित केलेला पर्यटन महोत्सव शिवसेनेने हायजॅक करून नगरपालिकेच्या आणि जनतेच्या पैशांची लूट केली आहे. महोत्सवासाठी बँका, ठेकेदार लॉबी, व्यापारी, सुवर्णकार व रॉक गार्डन येथील स्टॉलधारक यांच्याकडून लाखो पैसे उकळून त्याचा गैरवापर केला आहे असा आरोप माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी केला.

मालवण भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सुदेश आचरेकर यांनी पर्यटन महोत्सवाबाबत शिवसेनेवर जोरदार टीका केली. यावेळी माजी नगरसेवक दीपक पाटकर, विजय केनवडेकर, भाऊ सामंत, मोहन वराडकर, प्रमोद करलकर आदी उपस्थित होते. सध्या राज्यसरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नको आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून हवी तशी लूट करता यावी, त्यांना हवे तसे नाचवता यावे यासाठी राजकीय पदाधिकारी यांना निवडणुकीपासून वंचित ठेवून स्वतःच्या स्वार्थासाठी पिळवणूक करून राज्यसरकार आपला कुटील डाव साधत आहे.

ज्या आमदार वैभव नाईक यांना कधी साधा कार्यक्रम घेता आला नाही ते पर्यटन महोत्सव बाबत बोलतात हे हास्यास्पद आहे. शिवसेनेने नगरपालिकेचा पर्यटन महोत्सव आपणच केला असे भासवून त्यासाठी ठेकेदार, बिल्डर, सुवर्णकार यांच्याकडून पैसे उकळतानाच स्टॉलवर उदरनिर्वाह करणाऱ्या स्टॉलधारकांकडूनही पैसे घेतले.

पिगमी गोळा करतात तसे पैसे शिवसेनेच्या लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी गोळा केलेत. गोळा केलेली माया व त्याच्या माध्यमातून महोत्सव घ्यायला शिवसेनेला, आमदारांना काहीच कसे वाटले नाही. यामुळे जनतेच्या मनातील आदर शिवसेना आमदार व लोकप्रतिनिधी गमावून बसले आहेत. शहर वासीयांची फसवणूक करून आणि नगरपालिकेचा टेकू घेऊन स्व:खर्चातून महोत्सव केला, असे शिवसेनावाले म्हणत आहेत. महोत्सव आयोजनासाठी निविदा काढून नगरपालिकेच्या पैशाचाही दुरुपयोग करण्यात आला. हिंमत होती तर शिवसेनेचाच ब्रँड घेऊन का नाही महोत्सव केला ? असा सवाल सुदेश आचरेकर यांनी उपस्थित केला.

पर्यटन महोत्सवात स्टॉलसाठी उभारलेल्या गाळ्यांमध्ये चार जणांनीच गाळे घेतले. त्यांचा नीटसा धंदा झाला नसतानाही त्यांच्याकडूनही २ हजार रुपयांचे भाडे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी बळजबरीने वसूल केल्याची चर्चा आहे मात्र आपले पदाधिकारी काय गुण उधळतात हे पहायला आमदार नसतात. स्वखर्चातून महोत्सव घेण्यास धाडस लागते.

ते फक्त नारायण राणेच करू शकले. आमदार स्वखर्चाच्या बाता मारतात मग बँकांकडून स्पॉन्सरशीप कोणी घेतली. १० लाखाची निविदा काढली, मग तुम्ही नेमकं काय केलात ? गोळा केलेले धन गेले कुठे असा सवालही आचरेकर यांनी उपस्थित केला. लाखोंची माया कोणी गोळा केली, कोणासाठी केली, आणि कोणाच्या घशात गेली याचे आत्मपरीक्षण आम. नाईक आणि शिवसेनेने करावे, यापुढे स्वखर्चाच्या थापा मारणे बंद करावे असेही आचरेकर म्हणाले.

महोत्सवाला पालकमंत्री, खासदार का आले नाही ? ते न येणे हे आमदारांचे अपयश आहे. अशी टीकाही आचरेकर यांनी केली. दांडी येथील नगरपालिकेच्या पर्यटन महोत्सवाचे आपण स्वागत करतो. त्यासाठी मेहनत घेणाऱ्या मुख्याधिकारी संतोष जिरगे यांचे आपण आभार मानतो. तसेच महोत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी सहकार्य करणाऱ्या नगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांचेही आभार मानतो. दांडी येथेच महोत्सव घेण्यासाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या हरी खोबरेकर यांचेही आपण आभार मानतो, असेही आचरेकर म्हणाले.

You cannot copy content of this page