Headlines

आपले राजकीय हेतू साध्य करण्यासाठी परशुराम उपरकरांनी भाषेचा वाद उकरू नये — नितीन वाळके,

मालवण ता.१८-:* मालवणच्या या ३२व्या कोंकणी परिषदेत कोंकणी भाषेचा उद्घोष जरूर झाला, मात्र त्याला मराठी किंवा मालवणीच्या द्वेषाची किनार बिल्कूल नव्हती आणि सिंधुदुर्गातली कोंकणी ही गोव्यातील कोंकणी पेक्षा वेगळी आहे हे म्हणतांना खुद्द गोव्याच्याच विविध भागात बोलल्या जाणाऱ्या कोंकणीत प्रदेशा प्रदेशानुसार फरक आहे; तसा तो महाराष्ट्राच्या विविध विभागात बोलल्या जाणाऱ्या मराठीतही आहेच त्यामुळे आपले राजकीय हेतू साध्य करण्यासाठी परशुराम उपरकरांनी भाषेचा वाद उकरू नये असे स्पष्ट मत आम्ही मालवणीचे उपाध्यक्ष श्री नितिन वाळके यांनी पत्रकातून व्यक्त केले आहे.

कोकणी परिषदेचे ३२ वे अधिवेशन नुकतेच मालवण येथे बॅ.नाथ पै नगरीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या कोकणी परिषदेस गोव्याच्या मुख्यमंत्र्यांसह कोकणी राजभाषा मंत्री, मालवणचे आमदार आदी राजकीय नेत्यांसह ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ख्यातनाम कोकणी-मराठी लेखक दामोदर मावजो हे ख्यातनाम साहित्यिक आणि कोकणी परिषदेचे पदाधिकारी व बहुसंख्य कोकणी- मालवणी- मराठी लेखक कवि समिक्षक साहित्यिकांनी मोठ्या संख्येने आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या संपुर्ण परिषदेच्या कामकाजात एक साहित्य रसिक म्हणून मी स्वतः सहभागी झालो होतो.त्यामुळेच उपरकरांनी या कोकणी परिषदे मराठी संपवण्याचे काम करीत असल्याचा आरोप हा पुर्णपणे बिनबुडाचा, सर्वथा अनाठायी आहे आणि उपरकरांनी मांडलेल्या भुमिकेच्या बरोब्बर उलट मुद्द्यांवर कोकणी परिषदेचे कामकाज चालल्याचे श्री नितिन वाळके यांनी नमूद करून त्यांनी पत्रकात म्हटले आहे की, या ३२व्या कोकणी परिषदेचे संपुर्ण सुत्रसंचलन हे मालवणी बोलीतूनच झाले आणि मालवणी कवी म्हणून सर्वमान्य असलेले दादा मडकईकर, रूजारीओ पिंटो यांचे सह अनेकांनी या परिषदेच्या व्यासपीठा वरून आपल्या मालवणी बोलीतील कविता सादर केल्या ही वस्तूस्थिती आहे. स्वःभाषेचा अभिमान बाळगण्याच्या प्रत्येकाला अधिकार आहे, नव्हे ती प्रत्येकाची जबाबदारी आणि सांस्कृतीक गरजही आहे.मात्र स्वःभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषा आणि बोलींचा दुःस्वास करणे नक्कीच नव्हे याची साक्ष अनेक थोर मराठी साहित्यिकांच्या साहित्यात ठाई ठाई आढळते.कोंकणीच काय पण मराठी सह सर्व भारतीय भाषिकांना आपापल्या भाषेचा प्रचार प्रसार विस्तार करण्याचा अधिकार भारतीय राज्य घटनेनेच बहाल केलेला आहे. अमृताते पैजा जिंकणारी ज्ञानदेवांची मराठी ही अवघ्या मराठी मनाची अस्मिता आहे या बाबत कोणाच्याही मनात शंका असण्याचे कारण नाही; आणि कोणीही सच्चा मराठी प्रेमी अन्य भाषेचा द्वेषही करत नाही. यामुळेच तर उदगिर मुक्कामी नुकत्याच संपन्न झालेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून मराठी साहित्य परिषदेने ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त दामोदर मावजो यांनाच निमंत्रीत केले होते आणि या पुर्वीही अनेक मराठीतेतर साहित्यिकांनी मराठी साहित्य संमेलनाचे उदघाटकपद भुषविलेले आहे.याच उदगिरच्या संमेलनात दामोदर मावजोंनी पुढील मराठी साहित्य संमेलन गोव्यात घेण्याचे निमंत्रण ही म.सा.प.ला दिले आहे.यापुर्वीही मराठी साहित्य संमेलने ही महाराष्ट्राच्या बाहेर अगदी गुजराथ,कर्नाटक,मध्यप्रदेश बरोबरच पंजाबातील घुमान पासून पार छत्तीसगढ मधल्या रायपूर पर्यंत संपन्न झाली आहेत.विश्व मराठी संमेलन तर परदेशातच संपन्न होत असतात.तेव्हा त्या त्या त्या प्रांतातील किंवा देशांतील सर्वांनी त्यांचे व मराठी साहित्यिकांचेही भरभरून स्वागत व आदर सत्कारच केला आहे.या पार्श्वभुमीवर उपरकरांनी मालवणच्या कोंकणी परिषदेवर केलेला आरोप हा सर्वथा गैरलागू आहे.

मालवणच्या या ३२व्या कोंकणी परिषदेत कोंकणी भाषेचा उद्घोष जरूर झाला, मात्र त्याला मराठी किंवा मालवणीच्या द्वेषाची किनार बिल्कूल नव्हती आणि सिंधुदुर्गातली कोंकणी ही गोव्यातील कोंकणी पेक्षा वेगळी आहे हे म्हणतांना खुद्द गोव्याच्याच विविध भागात बोलल्या जाणाऱ्या कोंकणीत प्रदेशा प्रदेशानुसार फरक आहे; तसा तो महाराष्ट्राच्या विविध विभागात बोलल्या जाणाऱ्या मराठीतही आहेच! याच बरोबर उपरकर हे उपस्थित करतात तो मराठी-ख्रिश्चन हा मुद्दा ही संपुर्ण पणे आक्षेपार्ह असाच आहे.आज कोंकणी परिषदेच्या अध्यक्षा या सौ.उषा राणे या भुषवित आहेत तर या संपुर्ण संमेलनाच्या यशस्वी आयोजनाची धुरा रूजारीओ पिंटो यांनीच सांभाळली होती.आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पुढल्या वर्षीच्या कोंकणी परिषदेचे आयोजन करण्यासाठीचे निमंत्रण केरळ मधील कोकणीं भाषिकांनी मालवणात येऊन दिले आहे.

त्यामुळे मराठी संपविण्यासाठी कोंकणी परिषद काम करीत आहे किंवा तसा प्रयत्न मालवणच्या संमेलनात झाला हा उपरकरांचा निव्वळ गैरसमज आहे. मालवणातील अनेक मराठी साहित्य रसिकांनीही या ३२ व्या कोंकणी संमेलनात सहभागी होवून अनेक साहित्यिकांशी प्रत्यक्ष संवाद साधण्याचा आनंद मिळवला हीच या संमेलनाच्या यशस्वीतेची पोचपावती आहे.

You cannot copy content of this page