मालवण शहरात कचऱ्याची समस्या गंभीर

दुर्गंधीचे वातावरण ; नागरिकांसह पर्यटकांमधूनही तीव्र नाराजी

*मालवण ता.१७-:* पर्यटन शहर असलेल्या मालवण शहरात कचऱ्याची समस्या गंभीर बनली असून नगरपालिका प्रशासनाकडून जागोजागीचा कचरा वेळेत उचलला जात नसल्याने अनेक ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले दिसत आहे. यामुळे असच्छतेचे आणि दुर्गंधीचे वातावरण पसरले असून नागरिक तसेच पर्यटकांमधूनही तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कचऱ्याची समस्या ही मालवण शहराची नेहमीचीच डोकेदुखी ठरली आहे. घनकचरा व्यवस्थापना बाबत नगरपालिकेकडून यापूर्वी काही उपक्रम राबविले गेले. मात्र नंतर बारगळुन गेले.

कचरा उचल करण्यासाठी नेमलेल्या कंत्राटी स्वच्छता कामगारांचे पगार न दिले गेल्याने कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची भूमिका घेतल्याने त्यानंतर काही कामगार कमी झाले होते. स्वच्छता कर्मचाऱ्यांची कमतरता असताना त्याबाबत नगरपालिका प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. शहरात अनेक भागात कचऱ्याची गाडी वेळेवर येत नाही. तसेच गटारात, रस्त्यावर व इतर ठिकाणी कचरा साचून राहिल्याचे चित्र आहे. या कचऱ्यात ओला कचरा तसेच कुजलेले आंबे यांचा समावेश असल्याने दुर्गंधीही पसरत आहे. दुर्गंधीमुळे आरोग्याचाही प्रश्न निर्माण होत आहे.

सध्या पर्यटन हंगाम सुरू असल्याने शहरातील कचऱ्यात आणखी भर पडत असून बंदर जेटी परिसरात देखील कचऱ्याचे मोठे साम्राज्य पसरलेले आहे. नगरपालिका कायम स्वच्छ मालवण सुंदर मालवणचा नारा देते. तर अलीकडेच पर्यटन महोत्सवात देखील नगरपालिकेने स्वच्छतेचा संदेश दिला होता. मात्र स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यापलीकडे नगरपालिका प्रशासन कोणतीही ठोस उपाययोजना करताना दिसत नाही. कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने अनेक समस्या निर्माण होत आहेत. सार्वजनिक ठिकाणी तसेच वस्ती मार्गावर कचरा उचल गाड्या न आल्यास आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल असा इशारा नागरिकांमधून देण्यात येत आहे.

You cannot copy content of this page