बांदा ता.१३-:* पाडलोस माडाचे गाळव येथील पुलाच्या चढणीला रस्त्याची बिकट अवस्था झाली आहे. प्रशासनास वारंवार सांगूनही याकडे दुर्लक्ष होत असल्याने अपघातात टाळण्यासाठी स्थानिक युवकांनी श्रमदानातून मातीच्या साहाय्याने तात्पुरते खड्डे बुजविले. तसेच प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करावे अशी मागणी ग्रामस्थ अमेय गावडे यांनी केली आहे. मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या माडाचे गाळव रस्त्यात पडलेले दोन मोठे खड्डे ग्रामस्थ अमेय गावडे व बंटी गावडे यांनी श्रमदानातुन बुजवले.
यावेळी ते बोलत होते. रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. वारंवार प्रशासनाला सांगूनही त्याची दखल घेतली जात नाही. या वाडीत वरिष्ठ नागरिकांची संख्या जास्त आहे. तसेच आजारपण आल्यास रुग्णांना दवाखान्यात नेईपर्यंत खड्ड्यांचा अधिक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे प्रवासादरम्यान जर अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण असा सवालही अमेय गावडे यांनी केला आहे. प्रशासनाने पुढाकार घेऊन रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करावे अशी आर्त हाक माडाचेगावळ वाडीतील ग्रामस्थांनी प्रशासनास दिली आहे.
