*⚡मालवण ता.१२-:* मालवण नगरपालिकेचा अग्निशमन बंब नादुरुस्त होऊन निर्लेखीत केल्यानंतर सुमारे दोन वर्षानंतर मालवण नगरपालिकेच्या ताफ्यात नवा अत्याधुनिक अग्निशमन बंब दाखल झाला असून त्याचे लोकार्पण आज मालवण नगरपरिषद येथे आम. वैभव नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. शासनाच्या जुन्या धोरणानुसार एकदा एखाद्या नगरपालिकेस अग्निशमन बंब दिल्यावर पुन्हा देता येत नसल्याने याबाबत पाठपुरावा करून धोरणात बदल करून घेतल्यावर नव्या धोरणानुसार दुसऱ्यांदा अग्निशमन देण्यात येणारी मालवण नगरपालिका ही राज्यातील पहिली नगरपालिका आहे,
या बंबा मुळे शहरातील गैरसोय दूर होणार आहे, असे यावेळी आम. वैभव नाईक यांनी दिली. मालवण नगरपालिकेचा अग्निशमन बंब नादुरुस्त झाल्यानंतर तो निर्लेखीत करण्यात आला होता. त्यामुळे गेले दोन वर्षे अग्निशमन बंब नसल्याने शहरात व तालुक्यात आगीच्या घटनांवेळी बंबाच्या अभावामुळे गैरसोय निर्माण होत होती. तसेच नागरिक व व्यापाऱ्यांमधून देखील नाराजी व्यक्त झाली.
मात्र याबाबत आमदार वैभव नाईक, तत्कालीन नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी शासनाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे मालवण नगरपालिकेच्या ताफ्यात नवा अग्निशमन बंब दाखल झाला आहे. त्याच्या लोकार्पण प्रसंगी आम. वैभव नाईक, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, मुख्याधिकारी संतोष जिरगे, शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी नगरसेवक मंदार केणी, यतीन खोत, नितीन वाळके, तृप्ती मयेकर, सेजल परब, शिला गिरकर, सुनीता जाधव, आकांक्षा शीरपुटे, मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर, नितीन तायशेटे, रवी तळाशीलकर, नाना पारकर, पूनम चव्हाण, किरण वाळके, बाबी जोगी, भाई कासवकर, उमेश मांजरेकर, नरेश हुले, प्रसाद आडवणकर, महेंद्र म्हाडगुत, शिल्पा खोत आदी व इतर उपस्थित होते. यावेळी आम. वैभव नाईक म्हणाले, मालवण नगरपालिकेचा अग्निशमन बंब निर्लेखीत करण्यात आल्याने गैरसोय निर्माण झाली होती. मात्र शासनाच्या धोरणानुसार नगरपालिकेला पुन्हा बंब मिळणे शक्य नव्हते. तरीही याबाबत आपण नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करत पर्यटन शहर असलेल्या मालवणला अग्निशमन बंबाची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आणून दिले.
त्यामुळे शासनाच्या धोरणात बदल करून मालवण नगरपालिकेला नवीन बंब मंजूर करण्यात आला. या निर्णयामुळे राज्यातील इतर नगरपालिकांना देखील फायदा होणार आहे. नव्या धोरणानुसार अग्निशमन बंब प्राप्त होणारी मालवण नगरपालिका राज्यात पहिलीच आहे. मालवण शहरात विविध विकासकामे करण्यासाठी यापुढेही आपण प्रयत्नशील राहू असेही यावेळी आम. नाईक म्हणाले. यावेळी मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी उद्या दि. १३ मे पासून हा अग्निशमन बंब शहराच्या सेवेत रुजू होईल असे सांगितले. यावेळी अग्निशमन बंबातून मोकळ्या जागेत पाण्याचा मारा करत चाचणीही घेण्यात आली.
