अल्पभूधारक शेतक-यांसाठी किमान हमीभाव कायदा होणे आवश्यक-राजू शेट्टी

*⚡वेंगुर्ला ता.१०-:* भारत हा कृषिप्रधान देश आहे. भारतातील ६२ टक्के लोकांचे जीवन प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे शेतक-यांच्या प्रश्नावर गांर्भियाने विचार करण्याची गरज आहे. आज कोकणात ८० टक्के शेतकरी अल्पभूधारक आहेत. या ८० टक्के लोकांना डोळ्यासमोर ठेवून धोरण ठरविणे गरजेचे आहे. असंघटीत मजुरांसाठी ज्याप्रमाणे किमान वेतन कायदा आहे. त्याच धर्तीवर अल्पभूधारक शेतक-यासांठी किमान हमीभाव कायदा होणे आवश्यक असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी येथे केले. फूले, शाहू, आंबेडकर विचार मंच वेंगुर्ला तर्फे येथील साई मंगल कार्यालय येथे छत्रपती शिवाजी, महामा ज्योतिबा फूले, राजर्षी शाहू महाराज, व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती सोहळा पार पडला. फूले, शाहू, आंबेडकर विचार मंच वेंगुर्ल्याचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सरचिटणिस राजेंद्र गड्यानावर, माजी नगराध्यक्ष सुनिल डुबळे, फूले, शाहू, आंबेडकर विचार मंचचे सचिव के.जी.गावडे, उपाध्यक्ष प्रा.सुनिल भिसे, एन. पी. मठकर आदी उपस्थित होते. यावेळी फूले, शाहू, आंबेडकर विचार मंचचे सचिव के.जी.गावडे यांना कुडाळ पत्रकार समितीचा भैय्यासाहेब वालावलकर स्मृति जिल्हास्तरीय आदर्श पत्रकारीता पुरस्कार मिळाल्याबद्दल, मंचच्या महिला कार्यकारीणी प्रमुख विमल शिंगाडे यांना जिल्हा अध्यापक संघाचा आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाल्याबद्दल व मंचचे सदस्य, शिरोडा वेळागर येथे होणा-या राष्ट्रीय रस्सीखेच स्पर्धेचे आयोजक उदय भगत यांचा राजू शेट्टी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना राजू शेट्टी पुढे म्हणाले की, बळीराजा, छत्रपती शिवाजी महाराजांनी वतनदारी संपवून रयतेचे राज्य केले. वतनदारी संपवून वेतन सुरु केले. शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांना शेतक-यांच्या काडीलाही हात लावू नका असे आदेश दिले होते. आजही आदेश निघतात मात्र ते वेगळेच असतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात १२ वेळा दुष्काळ झाला. मात्र त्यांनी मदत करुन सर्वांना पुन्हा उभे केले. शिवाजी महाराजांचे संपूर्ण आयुष्य हे संघर्षात गेले. तरीही त्यांनी शेतक-यांच्या बारीकसारीक समस्याकडेही लक्ष दिले. शाहू महाराज हे संस्थानिक होते. त्यांना मर्यादित संधी होती. त्यांनी प्रथम राधानगरी धरण बांधले. त्यामुळे आज महाराष्ट्रात कोल्हापूर हा संपन्न भाग झाला. त्यांनी शेतक-यांच्या उत्पादीत मालासाठी बाजारपेठा निर्माण केल्या. बाजारपेठामध्ये शेतक-याना गाळे देवून त्यांना व्यापारी बनण्यास उद्युक्त केले. शेतकरी अडाणी राहू नये यासाठी शिक्षणाची दारे खुली केली. जगातील सर्वोतम घटना डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांनी दिली. मात्र आज आंबेडकर याची उंची कमी करण्याचा प्रयत्न होत आहे. शेतक-याना सवलतीच्या दरात वीज मिळाली पाहिजे ही भूमिका सर्वप्रथम आंबेडकर यांनी घेतली. पूर्वी शेतकरी वस्तूरुपात आदान प्रदान करीत होता. इंग्रज आल्यावर गावातील अर्थव्यवस्था विस्कळीत झाली. पैशाचा विनियोग सुरु झाला. त्यामुळे लोकांची उपासमार सुरु झाली.

आज शाहू, फूले, आंबेडकर यांचे नाव घेवून सत्तेवर आलेल्या लोकांनी त्यांचे धोरण न अवलंबिल्याने शेतक-याच्या आत्महत्या वाढल्या आहेत. आज देशाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. लॉकडाऊन मध्ये जगभरातील अर्थव्यवस्था कोलमडली असताना भारतातील अर्थव्यवस्थेवर मात्र त्याचा मोठा परिणाम झाला नाही. मात्र शासनाने त्याचा परतावा आज दिलेला दिसत नाही, अशी खंत व्यक्त केली. आज शेतीचे होणारे तुकडे थांबविणे गरजेचे आहे. तसेच कूळ कायद्याचा पुर्नविचार करण्याची गरज आहे. हे जोपर्यंत होत नाही. तोपर्यंत संपूर्ण जमिन शेतीखाली येणार नाही. शेतक-यांच्या पीकांना हमी भाव मिळावा यासाठी आपण प्रयत्नशिल असून त्यासाठी दबावगट करण्यात येणार आहे.

You cannot copy content of this page