साक्षी वंजारी:शैक्षणिक संस्थांचा वापर राजकीय हेतूसाठी करू नये, नगराध्यक्षांवर केली टीका..
⚡सावंतवाडी, ता.१९-:
सावंतवाडी येथे भाजपकडून काढण्यात आलेल्या रॅलीवर काँग्रेसकडून तीव्र टीका करण्यात आली आहे. ही रॅली घाईगडबडीत आणि अविचारी पद्धतीने काढण्यात आल्याचा आरोप काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी यांनी केला. “उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग” या म्हणीप्रमाणे ही रॅली असल्याचा टोला त्यांनी लगावला.
याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात त्या म्हणाल्या, महिला आरक्षण विधेयकावरील चर्चेच्या दिवशीच काही पदाधिकारी व नगराध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली काढण्यात आल्याबद्दल त्यांनी आक्षेप नोंदवला.प्रसिद्धीसाठी इतका उतावळेपणा का, असा सवाल उपस्थित करत एक दिवसही थांबता आले नसते का..?, अशी टीकाही त्यांनी केली.तसेच शैक्षणिक संस्थांचा वापर राजकीय हेतूसाठी करू नये, अशी स्पष्ट भूमिका मांडत विद्यार्थ्यांचा राजकारणासाठी वापर होत असल्याचा आरोप त्यांनी केला. विद्यार्थ्यांना आरक्षणाची संपूर्ण माहिती नसताना त्यांना या उपक्रमात सहभागी करून घेणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले आणि अशा प्रकारांवर कारवाईची मागणी केली.
महिला आरक्षणाबाबत काँग्रेसची भूमिका “समावेशक प्रतिनिधित्व” या तत्त्वावर आधारित असल्याचे वंजारी यांनी स्पष्ट केले. महिलांचा राजकारणातील सहभाग वाढवण्यासाठी तसेच अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसी महिलांना न्याय्य संधी मिळावी यासाठी आरक्षण अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
ओबीसी व मागासवर्गीय महिलांना दुहेरी भेदभावाचा सामना करावा लागतो. त्यावर मात करण्यासाठी आरक्षण हा प्रभावी उपाय असल्याचे त्यांनी सांगितले. पंचायत राज व्यवस्थेमध्ये महिला आरक्षणामुळे पाणी, आरोग्य आणि शिक्षण यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर सकारात्मक परिणाम झाल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.
ओबीसी महिलांसाठी स्वतंत्र उप-आरक्षण (सब-कोटा) देण्याची मागणी काँग्रेसने सातत्याने केली असून, त्याशिवाय आरक्षणाचा लाभ सर्व स्तरांपर्यंत पोहोचणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, केंद्र सरकारने पुढे आणलेले विधेयक हे प्रत्यक्ष महिला आरक्षणासाठी नसून मतदारसंघ पुनर्रचनेशी (डिलिमिटेशन) संबंधित असल्याचा आरोपही त्यांनी केला. महिला आरक्षण विधेयक २०२३ मध्ये मंजूर झाले असले तरी त्याची अंमलबजावणी लांबणीवर टाकली जात असल्याची टीका त्यांनी केली.
महिला आरक्षण तात्काळ लागू करावे, अशी मागणी करत या विषयाला काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा असल्याचे वंजारी यांनी शेवटी स्पष्ट केले.
