राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष सत्यवान साटेलकर यांची मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
वेंगुर्ले वेंगुर्ले न.प.तील कंत्राटी कर्मचारी नियुक्तीबाबत आवश्यक कागदपत्रे तातडीने मिळावीत, अशी मागणी वेंगुर्ले तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष सत्यवान साटेलकर यांनी वेंगुर्ले नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.दि.१ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०२२ या कालावधीतील संबंधित ५ प्रकारची कागदपत्रे तातडीने मिळावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, वेंगुर्ले नगरपरिषदेमध्ये गेली सुमारे १० वर्षे कार्यरत असलेले सुमारे ५० कंत्राटी कर्मचारी यांना संबंधित ठेकेदाराने कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक काढून टाकले. सदरील कर्मचाऱ्यांना अन्यायकारक पद्धतीने तडकाफडकी काढून टाकल्यामुळे या कर्मचार्यांवर उपासमारीची वेळ संबंधित ठेकेदार व नगरपरिषद प्रशासनाने आणली आहे. एकूण ५० कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी ७० टक्के कर्मचारी मागासवर्गीय समाजातील असून उर्वरित इतर समाजातील आहेत. नगरपालिका प्रशासन गेली अनेक वर्षे एकाच ठेकेदारास हे कंत्राट देत आहे. याबाबत लेखी पुरावा व खुलासा आपल्याकडून मिळावा. ठेकेदार व प्रशासन यांनी एकत्रित घेतलेल्या तुघलकी निर्णयामुळे या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. आपल्या या चुकीच्या निर्णयामुळे भविष्यात जीवितहानी झाल्यास त्यास ठेकेदार व प्रशासन जबाबदार असाल,असे निवेदनात म्हटले आहे.
या गंभीर प्रश्नांची शहानिशा, पडताळणी व पाठपुरावा करण्यासाठी, तसेच राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री, कामगार कल्याण मंत्री, सामाजिक न्यायमंत्री, आरोग्यमंत्री, अनुसूचित जाती जमाती आयोग (महाराष्ट्र राज्य), महिला आयोग (महाराष्ट्र राज्य), खासदार, पालकमंत्री, कोकण आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करुन न्याय मिळविण्यासाठी संबंधित कागदपत्रांची आवश्यकता असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
नगरपरिषद वेंगुर्ले यांनी संबंधित ठेकेदार नियुक्तीसाठी काढलेली जाहिरात, नगरपरिषद वेंगुर्ले व संबंधित ठेकेदार यांच्यातील करारपत्राची प्रत, ठेकेदार व त्यांनी नियुक्त केलेले कर्मचारी यांच्यातील करारपत्राची प्रत, मंजूर रक्कम व प्रत्यक्ष कर्मचाऱ्यांना मिळणारी रक्कम याबाबत माहिती, नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांची यादी इत्यादी ५ प्रकारची कागदपत्रे तातडीने मिळण्याबाबत मागणी करण्यात आली आहे.
