मालवण ता.०२-:* मालवण कसाल मुख्य मार्गावरील आनंदव्हाळ येथील रस्त्यावर आज सोमवारी वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना सापडलेला ऍप्पल कंपनीचा महागडा मोबाईल पोलिसांनी संबंधित मोबाईलधारक व्यक्तीचा शोध घेऊन त्यास मोबाईल परत केला. ड्युटीवर असताना पोलिसांनी दाखविलेल्या या कार्यतत्परतेचे सर्वांकडून कौतुक होत आहे.
आनंदव्हाळ येथे मुख्य रस्त्यावर ड्युटी करत असणारे वाहतूक पोलीस शाखेचे पोलीस हवालदार डी. एस. तारी, पोलीस हवालदार एम. बी. देऊलकर, पोलीस नाईक एन. आर. शेट्ये, पोलीस नाईक ए. जी. गायतोंडे यांना रस्त्यावर पडलेला मोबाईल सापडून आला. सदर मोबाईल हा ऍप्पल कंपनीचा सुमारे ७५ हजार किंमतीचा महागडा मोबाईल असल्याचे स्पष्ट झाले. हा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेत त्यावरून मोबाईल धारकाशी संपर्क साधला. हा मोबाईल मालवणात पर्यटनासाठी आलेल्या उस्मानाबाद येथील विशाल विलास हजारे यांचा असल्याचे स्पष्ट झाल्यावर त्यांना आनंदव्हाळ येथे बोलावून पोलिसांनी मोबाईल परत केला. दि. १९ नोव्हेंबर २०२१ रोजी सुकळवाड येथे सापडलेला महागडा मोबाईल याच पोलिसांनी मोबाईलधारकास मोबाईल परत केला होता. पुन्हा एकदा या पोलिसांनी कार्यतत्परता दाखविल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
