मालवण ता.२९-:* दुर्गवीर प्रतिष्ठान व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण तालुक्यातील रामगड किल्ल्यावर महाराष्ट्र दिन रामगड साजरा होणार आहे. या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन दुर्गवीर प्रतिष्ठान महाराष्ट्र आणि रामगड ग्रामस्थाच्या वतीने करण्यात आले आहे.
दुर्गवीर प्रतिष्ठान ही संस्था गेली 14 वर्ष संपूर्ण महाराष्ट्रात अपरिचित गडकिल्ल्याच्या संवर्धनासाठी कार्यरत आहे. दुर्गसंवर्धनासोबत, दुर्गभ्रमंती, विविध सण उत्सव गडावर साजरे करत, आपत्तीजनक परिस्थितीत सामाजिक बांधिलकी जोपासत जनसेवेचेही काम संस्थेमार्फत केले जात आहे.
दुर्गवीर प्रतिष्ठानच्या वतीने २०१५ साली गुढीपाडवाच्या मुहूर्तावर ‘किल्ले रामगड’ वर सुरु झालेल्या संवर्धन कार्यास यंदा सात वर्षे पूर्ण होत आहे. झाडीझुडपांमध्ये लुप्त असलेला ‘रामगड’ आज मोकळा श्वास घेतोय. हाच आनंदसोहळा महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने सर्वांसमवेत द्विगुणित करण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन करण्यार आले आहे.
1 मे रोजी सकाळी ठीक ९.०० वाजता रामगड बाजारपेठ ते रामगड किल्ला पालखी मिरवणूक यावेळी साहसी खेळाचे सादरीकरण, १०.०० वाजता गडपूजन,पालखीपूजन, छ. शिवाजी महाराजांचे पूजन,१०.३० वाजता स्वागत समारंभ, गडकिल्ले छायाचित्र प्रदर्शन उद्घाटन, दुपारी ११.०० वाजता शालेय विद्यार्थ्यांची भाषणे,पथनाट्य, पोवाडा, देशभक्ती पर गीत, यांचे सादरीकरण होणार आहे. सायंकाळी ठीक ०७.०० वाजता दीपोत्सव आणि मशालोत्सव साजरा होणार आहे.
स्वराज्याचा हा आनंदसोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी सहकुटुंब, सहपरिवार उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक दुर्गवीर प्रतिष्ठान महाराष्ट्र आणि रामगड ग्रामस्थ यांनी केले आहे.
