गाबीत दाखला, जात वैधता प्रमाणपत्रासाठी एकजुटीने लढा

बैठकीत निर्धार:गुरुवारी प्रांताधिकारी यांना देणार निवेदन

मालवण ता.२५-:* गाबित जातीचा दाखला आणि जात वैधता प्रमाणपत्राबाबत शासन दरबारी धोरणात्मक निर्णय होण्यासाठी एकजुटीने लढा देण्याचा निर्धार मामासाहेब वरेरकर नाट्यगृहात झालेल्या चर्चासत्रात करण्यात आला. गुरूवारी मालवण तालुका गाबित समाज कार्यकारिणीच्या वतीने गाबित ज्ञातीबांधवांच्या विविध मागण्यांचे सविस्तर निवेदन प्रांताधिकाऱ्यांना सादर केले जाणार आहे.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा गाबित समाज संघटक चंद्रशेखर उपरकर, मालवण तालुका गाबित कार्यकारिणी अध्यक्ष डॉ. प्रमोद कोळंबकर, उपाध्यक्षा अन्वेषा आचरेकर, खजिनदार मिथुन मालंडकर, सदस्य दादा वाघ, नरेश हुले, भाऊ मोरजे, अरविंद मोंडकर, पूजा सरकारे, सेजल परब, संतोष ढोके, सल्लागार महेश जुवाटकर, गाबित समाज मुंबई संघटनेचे पदाधिकारी शंकर पोसम, संजय केळुसकर, भानुदास येरागी, अन्वय प्रभू, रश्मीन रोगे, बाबी जोगी आदी उपस्थित होते. उपस्थित पालक आणि विद्यार्थ्यांनी आपल्या विविध अडचणी अधिकाऱ्यांसमोर मांडत शासनाने याप्रश्नी न्याय देण्याची मागणी केली. दरम्यान मे महिन्यातील सुट्टी कालावधीत गाबित विद्यार्थ्यांच्या दाखल्यांसाठी विशेष अभियान राबविण्याचा संकल्प चर्चासत्रात करण्यात आला. चर्चासत्रास महसूल निवासी नायब तहसीलदार आनंद मालवणकर आणि निवडणूक नायब तहसीलदार नागेश शिंदे यांनी उपस्थिती दर्शवून गाबित ज्ञाती बांधवांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच प्रशासकीयदृष्ट्या महत्वपूर्ण मार्गदर्शनही केले.

You cannot copy content of this page