आमदार चषक राज्यस्तरीय ज्युनियर ज्यूदो स्पर्धेचा उद्या पुण्यात प्रारंभ

सिंधुदुर्गातील पाच खेळाडू दाखविणार कसब

कणकवली ता.२०-:* महाराष्ट्र ज्यूदो असोसिएशनच्या वतीने आमदार चषक ४८ व्या राज्यस्तरीय ज्युनियर (मुले व मुली) ज्यूदो स्पर्धा आणि राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन २१ ते २३ एप्रिल दरम्यान टिळक रोड येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र ज्यूदो असोसिएशनचे महासचिव शैलेश टिळक यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कसबा विधानसभा मतदार संघाच्या व या स्पर्धेच्या संयोजिका मुक्ता टिळक, तांत्रिक समितीचे सचिव दत्ता आफळे, भाजपा कसबा विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष प्रमोद कोंढरे आणि स्पर्धा संचालक दीपक होले उपस्थित होते. शैलेश टिळक म्हणाले. या स्पर्धेसाठी कसबा मतदार संघाच्या विद्यमान आमदार सौ. मुक्ता टिळक यांच्या आमदार निधीतून या स्पर्धेसाठी आर्थिक सहाय्य मिळाले आहे.

तसेच शिक्षण प्रसारक मंडळी आणि महाराष्ट्रीय मंडळाचे सहकार्यसुध्दा लाभले आहे. आगामी काळात होणाऱ्या ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ निवडण्यात येणार असल्यामुळे या स्पर्धेला विशेष महत्व राहणार आहे. स्पर्धेसाठी राज्यातील ३१ जिल्ह्यातून सुमारे ३५० पेक्षा जास्त खेळाडू व त्यांचे मार्गदर्शक, संघ व्यवस्थापक आणि तांत्रिक अधिकारी सहभागी होणार आहेत. स्पर्धा मुला-मुलींच्या एकूण १६ वजनी गटात होणार आहे. राज्यातील ३५ तांत्रिक अधिकारी या स्पर्धेच्या आयोजनाची संपूर्ण जबाबदारी संभाळणार आहेत.

खेळाडू, मार्गदर्शक व व्यवस्थापकांची निवास व भोजनाची व्यवस्था सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या (स.प.) होस्टेलमध्ये करण्यात आली आहे. महाराष्ट्र ज्यूदो असोसिएशनच्या तांत्रिक समितीचे सचिव दत्ता आफळे म्हणाले, या स्पर्धेत १५ वर्षे पूर्ण आणि २१ वषार्खालील मुले आणि मुली सहभागी होणार आहेत. मुलांसाठी ५५ किलो वजनगटापासून १०० किलो वजनगटावरील असे ८ तर मुलींसाठी ४४ किलो वजनगटापासून ते ७८ किलोवरील असे ८ वजन गट असणार आहेत. बाहेरील जिल्ह्यातील खेळाडूंचे आगमन २१ एप्रिल रोजी सकाळी होईल. त्यानंतर खेळाडूंची वजने घेतली जाणार आहे. याचवेळी खेळाडूंच्या जन्म तारखेच्या दाखल्यांची आणि इतर कागदपत्रांची तपासणी होईल. दुपारनंतर प्रत्यक्ष स्पर्धेला सुरुवात केली जाईल. सिंधुदुर्गातील पाच खेळाडूंचा समावेश या राज्यस्तरीय स्पर्धेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मुलामधून युवराज संजय राठोड (कासार्डे), मोसिन मोमीन डिसोझा (हुंबरट) तर मुलीतून कु. कस्तुरी राजाराम तिरोडकर (कोंडिये),कु. प्रचिती उमेश तारी (हिंदळे) व कु. तन्वी प्रकाश पवार (फोंडाघाट) या ज्युदो खेळाडूंचा समावेश आहे.असे मिळून पाच खेळाडू पात्र ठरले असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा ज्युदो असोसिएशनचे सचिव दत्तात्रय मारकड यांनी दिली. पुणे येथील राज्य स्पर्धेत हे खेळाडू आपले कसब दाखविणार असून ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहेत.

You cannot copy content of this page