सावंतवाडी ता.१८-:* मुंबई येथील एस.आर.दळवी फाऊंडेशनच्या ‘टीचर टॉक फोरम’ ची मालवण तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली असुन अध्यक्षपदी अमर अशोक वाघमारे यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी (कार्यक्रम) श्रीम.तेजल गुरुनाथ ताम्हणकर आणि उपाध्यक्ष (सदस्यत्व विकास दीपक धर्माजी जाधव तर तालुका सचिवपदी दिनकर शिवराम शिरवलकर आणि सहसचिव म्हणून विकास बालाजी कपाटे यांची निवड करण्यात आली आहे.
एस. आर. दळवी फाउंडेशनचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष महेश सावंत यांनी ही कार्यकारणी जाहीर केली आहे. विलवडे गावचे सुपुत्र रामचंद्र धर्माजी दळवी यांनी मुंबईत राज्यस्तरीय एस. आर. दळवी फाऊंडेशनची स्थापना केली आहे. शिक्षक सक्षमीकरण हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून ही संस्था स्थापन करण्यात आली आहे. शैक्षणिक क्षेत्रात ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणारे प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंतचे सर्व शिक्षक या संस्थेच्या उपक्रमांमध्ये सहभागी होऊ शकतात.
ही संस्था शिक्षक संघटना नसून शिक्षकांना शैक्षणिक क्षेत्रातील नवनवीन संधी उपलब्ध व्हाव्यात, शिक्षकांमधील सुप्त कलागुणांचे प्रकटीकरण होण्यासाठी विविध स्पर्धा तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणारे विविध उपक्रम राबविणारी आणि उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करणारी संस्था आहे. एस. आर. दळवी फाऊंडेशनच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गुणवंत व उपक्रमशील शिक्षकांचा शोध घेऊन त्यांच्या शैक्षणिक कार्याचा जगभर प्रचार आणि प्रसार करण्यात येणार आहे.
तसेच शिक्षक विद्यार्थ्यांचे पर्यायाने देशाचे भविष्य घडवित असताना आणखी काय करता येईल यासाठीच एस आर फाउंडेशनने ‘टीचर टॉक’ ॲप हे व्यासपीठ शिक्षकांसाठी निर्माण केले.
या ऍपच्या माध्यमातून शिक्षक एकाच व्यासपीठावर येणार असून विचारांची देवाण घेवाण होणार आहे. त्यामुळे शिक्षकांनी यात सहभागी होऊन आपल्या कल्पना, संकल्पना व सुचना या ऍपवर मांडायच्या आहेत. ‘टीचर टॉक फोरम’ ची स्थापना ही केवळ शिक्षकांचा विकास व त्यांना सन्मान मिळावा या उद्देशाने झालेली आहे. या ॲपच्या माध्यमातून जागतिक स्तरावरील अनुभवी शिक्षकांच्या ज्ञानाचा फायदा होणार आहे. तसेच शैक्षणिक बातम्या आपणास ‘टीचर टॉक’ ॲपमध्ये पाहावयास मिळणार आहेत. तसेच राज्यभरातील इतर शिक्षकांशी संवाद साधता येणार असून आपले उपक्रम त्यांच्यापर्यंत पोहचण्याची सुवर्णसंधी सर्वांना उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जिल्हयातील सर्व शिक्षकांनी सदर ॲप मोबाईलमध्ये डाउनलोड करून नोंदणी करावी असे आवाहन जिल्हाध्यक्ष महेश सावंत यांनी केले आहे.
