काॅ.संपत देसाई यांचे कणकवली महाविद्यालयात व्याख्यान
*सावंतवाडी-* डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतातील शेती विषयक प्रश्नांचा अभ्यास केला होता. छोटे शेतकरी, छोटे व्यवसायिक यांना परवडेल अशा पद्धतीचे शेतीचे धोरण राबवले पाहिजे. ग्रामीण भागांमध्ये जलसिंचनाच्या सुविधा निर्माण करून नदीजोड प्रकल्प सारखे महत्वकांक्षी प्रकल्प राबविण्याची योजना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडली होती. शेतकऱ्यांना शेतीची अवजारे, बी बियाणे मोफत दिली.पाहिजेत. शेतकरी, कामगार, व्यवसायिक,व गरीबांना संकटकाळी आर्थिक मदत केली पाहिजे अशी भूमिका संसदेत मांडणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे शेतकऱ्यांचे खरे कैवारी होते .डॉ. बाबासाहेबांची शेती विषयक योजना स्वातंत्र्यानंतर राबवली असती तर आज शेतकऱ्यांच्या आत्महत्या कराव्या लागल्या नसत्या असे प्रतिपादन आजरा जि.कोल्हापूर येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कॉ. संपत देसाई यांनी व्यक्त केले.
कणकवली येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात भगवान महावीर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.राजेंद्रकुमार चौगुले होते तर मंचावर पर्यवेक्षक मंगलदास कांबळे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. युवराज महालिंगे उपस्थित होते. पुढे बोलताना संपत देसाई यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्वांगीण विचारांवर प्रकाश टाकला.’डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि कार्य आजच्या पिढीने समजून घेतले पाहिजे हाच जयंती उत्सवाचा खरा आदर्श असतो,असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी वर्धमान महावीर यांच्या विषयी डॉ.मारोती चव्हाण,प्रा. प्रियांका तेंडोलकर आणि प्रा. सुनील सोनवणे यांनी विचार व्यक्त केले. *भगवान महावीरांची अहिंसाच जगाला तारेल-* प्राचार्य डॉ.चौगुले अध्यक्षीय मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. राजेंद्रकुमार चौगुले म्हणाले की, अहिंसा, सत्य ,अस्तेय,अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य हे जैन धर्माची पंचसूत्रे आहेत. या पंच सूत्राचा अंगीकार केल्यास मानवाला कल्याणाचा मार्ग खुला होईल.आजच्या काळामध्ये आपण पाहतो की युक्रेन – रशिया यासारख्या देशात महायुद्ध चालू आहे या अशा संघर्षमय परिस्थितीत गौतम बुद्ध व भगवान महावीर यांचे अहिंसावादी विचारच जगाला तारणारे आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार व कार्यावर प्रकाश टाकताना डॉ.चौगुले पुढे म्हणाले की , डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी खऱ्या अर्थाने स्वाभिमानाने आणि स्वावलंबनाने जगण्याची शिकवण दिली. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील गुण हेरले आणि दलित समाजातील खंभीर नेतृत्व म्हणून बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरव केला. तो नंतर सार्थ झालेला आपण पाहतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे पुढील काळामध्ये दीन दलित व शोषित समूहाचे नेते म्हणून सक्रिय झाले. भगवान महावीर व डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवांचे सर्व विचार जोपासावेत असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. युवराज महालिंगे यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा.हरिभाऊ भिसे यांनी केले. याप्रसंगी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
