कायमस्वरूपी शिक्षक मिळणेसाठी तोंडवळी खालची शाळेचे पालक आक्रमक

पंधरा दिवसांत शिक्षक न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा

मालवण ता.१६-:* तोंडवळी खालची या इयत्ता सातवी पर्यंतच्या शाळेला येत्या पंधरा दिवसांत कायमस्वरूपी शिक्षक न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा या शाळेच्या पालकांनी दिला आहे. तोंडवळी खालची शाळेत शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याबाबत चे निवेदन मालवण गटशिक्षणाधिकारी यांना देण्यात आले आहे.

तोंडवळी खालची या इयत्ता सातवी पर्यंत असलेल्या आणि पटसंख्या सव्वीस असलेल्या प्राथमिक शाळेत सध्या तीनच शिक्षक कार्यरत आहेत. येथे कार्यरत शिक्षिकेबद्दल पालकांमध्ये नाराजी असून त्यांची कायमस्वरूपी बदली करून त्यांच्या ऐवजी दुसरा चांगला शिक्षक देण्यात यावा तसेच एक पदवीधर शिक्षकही देण्यात यावा या साठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जितेंद्र चोडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली होती.

यावेळी नंदकुमार कोचरेकर,सुरेंद्र मालंडकर,लाडोबा आडकर,पुंडलिक मालंडकर यांच्या सह शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक आदी उपस्थित होते.या बैठकीत गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन देवून पंधरा दिवसांत शिक्षक न मिळाल्यास आंदोलन करण्याचे ठरविण्यात आले होते. त्याप्रमाणे निवेदन देत कायमस्वरूपी शिक्षकाची मागणी करण्यात आली आहे. यात सन २०१९-२० मध्ये शिक्षकांसाठी पंचायत समिती मालवण समोर मुलांसहीत ठिय्या मारत शाळा बंद आंदोलन केल्याचा उल्लेख करून येत्या पंधरा दिवसांत शिक्षक न मिळाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

You cannot copy content of this page