कुडाळ ता.१३-:* कोकण, मालवणी भाषा, संस्कृती आणि निसर्ग सौंदर्य मला सतत भावतो,ते मी कधीच विसरू शकत नाही, असे प्रतिपादन सोनी मराठी हास्यजत्रा फेम रसिका वेंगुर्लेकर यांनी केले. श्रीमती मनोरमा चौधरी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामाचे कौतुक त्यांनी केले. वालावल येथील श्री देव लक्ष्मी नारायण मंदिरात जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीचा मनोरमा चॅरिटेबल ट्रस्ट वालावल यांचेवतीने सन्मान करण्यात आला.
अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर, पत्रकार अभिमन्यू लोंढे, संदेश तायशेटे, क्रिडा क्षेत्रातील संतोष वेंगुर्लेकर, त्रृतीका पालकर (माणगाव), प्रमोद काळसेकर, प्रज्वल कुलकर्णी, कुडाळच्या बिलिमारो एकांकीचे कलाकार तसेच सिंधु रक्त मित्र प्रतिष्ठान यांचाही मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला. श्रीमती मनोरमा चौधरी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सुरू असलेल्या कार्यक्रमाचे मान्यवरांनी कौतुक केले. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष रणजीत देसाई, उद्योजक सुनिल भरडकर, मनोरमा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष दयानंद चौधरी, निवती पोलीस निरीक्षक दाजी वारंग, सचिव संदिप साळसकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कथक विशारद मृणाल सावंत व सहकारी कलाकार चिमणी पाखरं यांचा विविधांगी नृत्याविष्कार सादर करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दयानंद चौधरी व आभार संदिप साळसकर तर सुत्रसंचालन बादल चौधरी यांनी केले.
