*मालवणचे उपसभापती राजू परुळेकर यांची सरकार वर टीका
मालवण-:शेतकरी नुकसान भरपाईपोटी शासनाने शेतकर्यांसाठी प्रतिगुंठा १०० रुपये आर्थिक मदत करताना शेतकर्यांची चेष्टा केल्याचा आरोप करीत मालवणचे उपसभापती राजू परुळेकर यांनी शेतीसाठी होणारा खर्च पाहता एवढी मदत घेण्यासाठी आमचा शेतकरी गरीब नाही. नुकसानीच्या पाहणीसाठी मोठे दौरे करूनही तुटपुंजी मदत दिली जात असेल तर यापुढे अशी पाहणी करू नये असे ठणकावून सांगत महाराष्ट्र शासनाच्या धोरणावर श्री परुळेकर यांनी नाराजी व्यक्त केलीं मालवण तालुका पंचायत समितीची मासिक सभा सभापती अजिंक्य पाताडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपसभापती राजू परुळेकर, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, सहायक गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, पंचायत समितीचे गटनेते सुनील घाडीगावकर, अशोक बागवे, विनोद आळवे, कमलाकर गावडे, मधुरा चोपडेकर, मनीषा वराडकर, निधी मुणगेकर, सोनाली कोदे, सागरिका लाड, गायत्री ठाकूर यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते. या सभेस सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अनुपस्थित राहिल्याने त्यांच्या सातत्याने गैरहजर राहण्याबाबत सुनील घाडीगांवकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तालुक्यात रखडलेल्या कामांबाबत साचेबद्ध उत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे संबंधित अधिकारी सभेस उपस्थित राहत नाहीत तोपर्यत सभा पुढे चालवू नये, अशी भूमिका सुनील घाडीगावकर यांनी घेत सभेचे कामकाज रोखले. अखेर पंचायत समिती प्रशासनाने संबंधित बांधकाम विभागात चौकशी केली असता संबंधित अधिकारी हे ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रमासाठी असल्याने सभेला अनुपस्थित राहिले असल्याचे सांगितले. त्यानंतर सभेच्या कामकाजास सुरवात झाली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबंधित असणार्या सर्व विषयांवर एक बैठक घेवून याबाबत वरिष्ठ अधिकार्यांची भेट घेण्यात यावी, अशी सूचना श्री. घाडीगावकर यांनी केली. असरोंडी येथे बांधलेल्या एका बंधार्यात एक थेंबही पाणी राहत नसल्याने शासनाचे नऊ लाख रुपये वाया गेले आहेत. याला लघुपाटबंधारे विभागाचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप श्री. घाडीगावकर यांनी केला. त्यामुळे या कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कारवाईची मागणी त्यांनी केली. गेले अनेक महिने या विषयावर सभागृहात चर्चा केली जात असताना अधिकारी त्या ठेकेदाराला का पाठीशी घालत आहेत. या बंधार्यात पाणी थांबले पाहिजे याची कार्यवाही करा अन्यथा त्या ठेकेदारावर कारवाई करा अशी सूचना श्री. घाडीगावकर यांनी केली. यावर संबंधित अधिकार्यांनी येत्या काही दिवसात याबाबतची कार्यवाही केली जाईल असे स्पष्ट केले. देवबाग येथे समुद्रात धूप रोखण्यासाठी घातलेल्या जिओ ट्यूब खराब झाल्या बाबत तक्रार करूनही अद्याप कोणतीही कार्यवाही न झाल्याने मधुरा चोपडेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शासन परिपत्रकाचे वाचन मासिक सभेत करणे आवश्यक असताना काही ग्रामसेवक त्याचे वाचन करत नसल्याची माहिती कमलाकर गावडे यांनी सभागृहात देत याबाबत पुढील सभेत सविस्तर माहिती देऊ, अशा ग्रामसेवकांवर काय कारवाई होईल हे सभागृहाने स्पष्ट करावे असे सांगितले. गतवर्षी मंजूर झालेल्या हडी शेलटी रेवंडी रस्त्याचे काम संबंधित ठेकेदाराने अद्यापही केलेले नाही. त्यामुळे हे काम त्या ठेकेदारास पुन्हा देण्याची आपली इच्छा नाही, असे सांगत त्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे, असा ठराव सोनाली कोदे यांनी सभागृहात मांडला. मालवण तालुक्यात ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून नवीन नळपाणी योजनेच्या प्रस्तावांची कामे होत नसल्याने या कामांमध्ये तालुका जिल्ह्यात आठव्या क्रमांकावर फेकला गेला आहे, असे माजी सभापती सुनील घाडीगांवकर यांनी पंचायत समिती सभेत सांगत ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.