कुडाळ पोलिसांची माणगाव खोऱ्यात कारवाई:प्रकारणाची पाळेमुळे आजऱ्या पर्यंत ; पथक रवाना..
⚡कुडाळ ता.०२-: कोणत्याही परवान्याशिवाय बंदुका बनवण्याचे साहित्य आपल्या ताब्यात बाळगल्या प्रकरणी कुडाळ तालुक्यातील मोरे-मधलीवाडी येथील शांताराम दत्ताराम पांचाळ (वय ४१) व आप्पा उर्फ परेश कृष्णा धुरी (वय ३२ रा माणगांव) या दोघांना कुडाळ पोलीसानी ताब्यात घेतले. कुडाळ पोलिसांच्या पथकाने पहाटे ६.५० वाजता शांताराम पांचाळ यांच्या घरी छापा टाकून ही कारवाई केली. या छाप्यामध्ये पोलिसांना गवारेड्याचे व हरिणाचे शिग सापडले असून ते पोलीसानी जप्त केले आहे. दरम्यान आप्पा उर्फ परेश कृष्णा धुरी (वय ३२ रा. माणगाव कुंभारवाडी) याला यामध्ये बंदुकीसाठी साहित्य पुरवल्याप्रकरणी कुडाळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामध्ये तीन बंदुका व बंदूक बनवण्याचे साहित्य मशीन यासह १ लाख १७ हजार चे साहित्य पोलिसांच्या हाती लागली असून ते जप्त करण्यात आले आहे . दरम्यान यामध्ये अजून काही जणांचा हात असण्याची शक्यता असून याची पाळेमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा भागापर्यंत पसरली असून पोलिसांचे एक पथक आजरा भागात गेल्याचे समजते.
कुडाळ पोलिसांना मोरे येथील एक इसम बेकायदेशीरित्या बंदूक बनवत असल्याची माहिती मिळाली होती. यानुसार कुडाळ पोलिसांचे पथक पहाटेच माणगाव खोऱ्यात रवाना झाले होते. पहाटे ६.५० वाजण्यच्या सुमारास मोरे येथील शांताराम पांचाळ यांच्या घरी छापा टाकला. यामध्ये तीन बंदुका सापडल्या. त्यात दोन काडतुस व एक ठासणीच्या बंदुकीचा समावेश आहे. दोन एअर गन, बंदुकाचे आठ बट, बंदुकीचे १४ बॅरल, तीन जिवंत काडतुसे, वीस रिकामी काडतुसे, व बंदुकीचे इतर पार्ट यामध्ये चाप, ब्लॉक, ट्रिगर असे साहित्य पोलिसांच्या हाती लागले. हे सर्व बनवण्यासाठी वापरण्यात येणारी वेल्डिंग मशीन, कानस व इतर साहित्यही पोलिसांनी जप्त केले आहे. तसेच पाचाळ याच्या घरी गवा रेड्याचे एक शिंग व सांबराचे एक कवठीसहित शिंग पोलिसांच्या हाती लागले आहे.
पोलिसांनी या कारवाईनंतर केलेल्या तपासात यामध्ये बंदूक बनवण्यासाठीचे काही साहित्य आप्पा उर्फ परेश कृष्णा धुरी यांच्याकडून मिळाल्याचे समजले. यानंतर पोलिसांनी आपला मोर्चा माणगावच्या दिशेने वळवत त्यालाही या प्रकरणी ताब्यात घेतले. या कारवाईमध्ये पोलिसांनी सुमारे १ लाख १७ हजार ५७० रुपयाचे साहित्य जप्त केले आहे. संगनमताने कोणत्याही परवान्याशिवाय बंदूक बनवण्याच्या उद्देशाने साहित्य व बंदुका ताब्यात बाळगल्याप्रकरणी शांताराम दत्ताराम पांचाळ व आप्पा उर्फ परेश कृष्णा धुरी यांच्यावर कुडाळ पोलिसात भारतीय न्याय सहिता कलम 49, 3(5), शस्त्र अधिनियम 3, 5,7, 25, 27, 29 तसेच गवारेडा व सांबर यांचे शिंग बाळगल्या प्रकरणी भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम 9 31, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 65 (ई) यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अनिरुद्ध देसाई करत आहेत. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ मोहन दहिकर, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक नयोमी साटम, सावंतवाडी उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे, यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, पोलीस कृष्णा केसरकर, प्रमोद काळसेकर, महेश भोई, सखाराम भोई, भूमिका रेडकर, समीर बांदेकर, नितीन शेडगे यांच्या पथकाने केली. या घटनेनंतर अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक नयोमी साटम व सावंतवाडी उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
दरम्यान या घटनेचे धागेदोरे कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा भागापर्यंत पसरल्याचे समजते. यानुसार पोलिसांचे एक पथक आजरा भागात गेल्याचेही समजते. तसेच यामध्ये अजून काही संशयीताचा हात असण्याची शक्यता असून पोलीस त्यांचा कसून तपास करत आहेत.