कणकवली नगरपंचायतीकडून कर वसुलीचे 95 टक्के उद्दिष्ट पूर्ण

कणकवली ता.०७-:* २०२१- २२ या आर्थिक वर्षात कणकवली नगरपंचायतीने करू वसुलीच्या उद्दिष्टांपैकी ९४.८५ टक्‍के मालमत्ता कर वसूलीचे उद्दीष्‍ट पूर्ण केले आहे. तर पाणीपट्टीची केवळ ६० टक्‍के वसूली झाली आहे. मे अखेरपर्यंत उर्वरित घरपट्टी आणि पाणीपट्टी वसूल होण्याची अपेक्षा नगरपंचायत च्या सूत्रांकडून वर्तवण्यात आली आहे.

दरम्‍यान करवसूलीसाठी नुकतेच शहरातील मालमत्तांचेही नव्याने सर्वेक्षण करण्यात आले. कणकवली नगरपंचायत अंतर्गत आतापर्यंत असलेल्या एकूण ७ हजार ४०० मालमत्ता आढळल्‍या आहेत. करवसुली करिता जिल्ह्यातील मालवण शहर तसेच अन्य काही भागात मालमत्ता कर वसूलीसाठी जप्तीची किंवा मालमत्ता सील करण्याची कारवाई करावी लागली होती.

सुदैवाने कणकवली शहरातील सुमारे ९५ टक्‍के मालमत्तांची कर वसूली झाली आहे. त्यामुळे ही कारवाई टळली आहे. तर मुंबई आणि राज्‍याच्या इतर भागात कायमस्वरूपी वास्तव्यास असणाऱ्या मालमत्ता धारकांनी मे महिन्यात गावी आल्‍यानंतर मालमत्ता कर भरण्याचे कळविले आहे. त्‍यामुळे मे अखेरपर्यंत संपूर्ण मालमत्ता कराची वसूली होईल अशी माहिती नगरपंचायतीचे कर वसूली अधिकारी यांनी दिली. गेल्‍या आर्थिक वर्षात नगरपंचायतीला १ कोटी १४ लाख रूपये मालमत्ता कर वसूलीचे उद्दीष्‍ट होते. यातील १ कोटी ८ लाख रूपयांची वसूली झाली आहे.

कणकवली शहरात १ हजार ५७४ नळ ग्राहक आहेत. त्‍यांच्याकडून गेल्‍या आर्थिक वर्षात १९ लाख ६९ हजार पाणीपट्टी वसूलीचे उद्दीष्‍ट होते. मात्र मार्च अखेरपर्यंत ११ लाख ७४ हजार एवढी पाणीपट्टी वसूली झाली आहे.

पाणी पट्टीचीही पूर्ण वसूली मे अखेर पर्यंत होण्याची शक्‍यता नगरपंचायतीकडून व्यक्‍त करण्यात आली. कणकवली शहराचा नवा विकास आराखडा सध्या तयार केला जात आहे. त्‍याअनुषंगाने नुकतेच शहरातील सर्व मालमत्तांचेही सर्वेक्षण करण्यात आले. यात शहरात ७ हजार ४०० मालमत्ता आढळून आल्‍या आहेत. या सर्व मालमत्तांवर कर आकारणी करण्यात आल्‍याची माहिती देण्यात आली.

You cannot copy content of this page