बांदा ता.०६-:* डिंगणे-आंबेडकरनगर येथील प्रिया रामदास डिंगणेकर यांच्या घरावर काल मध्यरात्री झालेल्या अवकाळी पावसात विजेचा लोळ कोसळल्याने घराच्या छपराचे व भिंतीचे नुकसान झाले. सुदैवाने डिंगणेकर कुटुंबीय यातून बचावले. काल बांदा दशक्रोशीला मुसळधार अवकाळी पावसाचा फटका बसला. सायंकाळी उशिरा विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. रात्री उशिरा डिंगणेकर कुटुंबियांच्या घरावर अचानक वीज कोसळली.
वीज छपराच्या पत्र्यातून आत भिंतीवर कोसळली. त्यामुळे काही पत्र्यांचे नुकसान झाले तर भिंतीला दोन ठिकाणी तडे गेलेत. यामध्ये डिंगणेकर कुटुंबियांच्या घराचे नुकसान झाले. वीज कोसळली त्यावेळी प्रिया डिंगणेकर या आपल्या मुलासह घरात होत्या. मात्र सुदैवाने दोघेही बचावल्याने मोठी दुर्घटना टळली. सरपंच संजय डिंगणेकर, प्रदीप सावंत यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.
