मालवण दि प्रतिनिधीमालवण येथील बॅरिस्टर नाथ पै सेवांगणच्यावतीने दिला जाणारा मधु वालावलकर समाज सेवक पुरस्कार” आचरे येथील श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिरचे विद्यमान अध्यक्ष श्रीकांत रघुनाथ सांबारी यांना जाहीर झाला आहे. रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप असून सदर पुरस्काराचे वितरण रविवार दिनांक ८ मे २०२२ रोजी संध्याकाळी ४ वाजता श्री देव रामेश्वर वाचन मंदिर आचरे येथील सभागृहात एका विशेष कार्यक्रमात होणार आहे.
श्रीकांत रघुनाथ सांबारी यांनी बॅरिस्टर नाथ पै, प्रा. मधु दंडवते यांची प्रेरणा घेऊन गेले अर्धशतक आचरे पंचक्रोशीची निरपेक्ष वृत्तीने सेवा केली. आचरे गावच्या शैक्षणिक, सामाजिक, भौतिक, अध्यात्मिक, आरोग्यविषयक विकासात श्रीकांत सांबारी यांचा सिंहाचा वाटा आहे. अनेक संस्थांच्या सहकार्याने त्यांनी गेले अर्धशतक आचरे पंचक्रोशीची सेवा केली आहे. आचरे व्यापारी संघटना, श्री साई सेवा मंडळ, दी आचरा प्युपील असोसिएशन, काकड आरती सेवा संघ, इनामदार श्री देव रामेश्वर देवस्थान, आनंद बाल नाट्य मंडळ, माणिक क्रिकेट क्लब आदी विविध संस्थांवर विविध पदांवर त्यांनी सेवा बजावली आहे.
