इन्सुली एक्साइजची मोठी कारवाई : ९६ लाखांचा मुद्देमाल जप्त
*⚡बांदा ता.०२-:* गोव्यातून मालवणच्या दिशेने जाणार्या ट्रकवर कारवाई करुन इन्सुली उत्पादन शुल्क विभागाने तब्बल ७३ लाख ९२ हजार रुपयांचा दारुसाठा जप्त केला आहे. तसेच दारु वाहतुकीसाठी वापरलेला २२ लाख रुपये किमतीचा आयशर टेम्पो (एमएच ०७ एजे २६७२) असा एकूण ९५ लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
बेकायदा दारु वाहतूक प्रकरणी प्रशांत वामन शेमडकर (४१, रा. लोहारवाडी, हेदूळ, ता. मालवण) याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. इन्सुली उत्पादन शुल्क चेकपोस्टवर गोव्यातून येणाऱ्या वाहनांची तपासणी सुरु होती. मालवणच्या दिशेने जाणार्या ट्रकची तपासणी केली असता मागील हौद्यात मोठ्या प्रमाणात दारुसाठा आढळून आला. रॉयल ब्ल्यू व्हिस्कीच्या १८० मिली मापाचे एकूण ११०० बॉक्स (५२,८००) बाटल्या आढळून आल्या. बाजारभावाप्रमाणे त्याची किंमत ७३ लाख ९२ हजार रुपये इतकी आहे. तसेच दारु वाहतुकीसाठी वापरलेला २२ लाखांचा टेम्पो असा एकूण ९५ लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाई इन्सुली चेकपोस्टवर निरीक्षक एस. पी. मोहिते यांच्या पथकाने केली.
