सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न
*⚡मालवण ता.०२-:* संकट काळात नकारात्मक आणि सकारात्मक असे दोन्ही मार्ग उपलब्ध असतात, त्यापैकी केवळ सकारात्मक मार्गाचाच अवलंब करा, असे प्रतिपादन मालवणचे लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी येथे बोलताना केले. मालवण येथील कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाच्या स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा द्वि वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ कै. नरहरी प्रभुझांट्ये सभागृहात संपन्न झाला. या समारंभाचे प्रमुख पाहुणे श्री. लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी विद्यार्थ्यांना करियर संधीबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी २०२०- २१ आणि २०२१-२२ या दोन्ही वर्षांची पारितोषिके श्री खोबरेकर आणि इतर मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर संस्था कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर, कार्यकारिणी सदस्य साईनाथ चव्हाण, संदेश कोयंडे, प्राचार्या डॉ उज्ज्वला सामंत, डॉ. रामचंद्र काटकर, प्रा. एच. एम. चौगले, डॉ. सुमेधा नाईक आणि पंकज कवटकर उपस्थित होते. प्रारंभी जिमखाना प्रमुख डॉ सुमेधा नाईक यांनी प्रास्ताविक आणि उपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. रामचंद्र काटकर हे प्रदीर्घ सेवेनंतर पुढील महिन्यात सेवानिवृत्त होणार असल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बाळासाहेब पंत वालावलकर, साईनाथ चव्हाण, ज्योती तोरसकर, पंकज कवटकर, प्रभारी प्राचार्य डॉ. उज्ज्वला सामंत यांनी मनोगते व्यक्त केली. शेवटी जिमखाना विभागाचे सहाय्यक प्रा.एच. एम. चौगले यांनी पारितोषिक वाचन आणि आभार प्रदर्शन केले. प्रा. बी. एच. चौगुले यांनी या सोहळ्याचे सूत्रसंचालन केले. यावेळी विद्यार्थी – विद्यार्थिनी, प्राध्यापक, शिक्षेकतर कर्मचारी, संस्था सदस्य उपस्थित होते.
