मालवण ता.०२-:* पर्यटन नगरी असलेल्या मालवण शहराच्या पर्यटनात आणखी एक भर पडणार असून शहरात रेवतळे येथे मत्स्यालय उभारण्यात येणार आहे. पर्यटन मंत्री तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मालवण भेटी नंतर मालवण नगरपालिकेने प्रस्तावित केलेल्या मत्स्यालयाला २५ कोटी रुपये मंजूर केले आहेत. या प्रकल्पामुळे रोजगाराच्या संधी देखील निर्माण होणार आहेत, अशी माहिती मालवणचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली असून निधी मंजूर केल्या बद्दल कांदळगावकर यांनी मालवण वासीयांच्या वतीने ना. ठाकरे यांचे आभार मानले आहेत.
महेश कांदळकर यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की मालवण शहर हे पर्यटन दृष्ट्या विकसित होत आहे, आणि हे शहर पर्यटनाबाबत अग्रेसर होण्याच्या दृष्टीने आम्ही २०१६ साली सत्तेत आल्यापासून प्रयत्नशील आहोत. कोट्यावधी रुपयाची विकासकामे प्रस्तावित करत असताना पर्यटनाच्या दृष्टीने मालवण मध्ये चांगल्या प्रकारचा मत्स्यालयाचा प्रस्ताव सादर करणे बाबत आमदार वैभव नाईक यांनी सूचना केली होती. त्यानुसार २०२० मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मालवण भेटीच्या वेळी त्यांना मालवण न.प. च्या वतीने मत्स्यालयाचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्याच प्रमाणे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडेही प्रस्ताव सादर करण्यात आले होते. त्यानंतर खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक या सर्वांनी याबाबत पाठपुरावा करून हा प्रकल्प मंजूर करण्यात महत्वाचे योगदान दिले आहे.
या मत्स्यालय प्रकल्पामुळे मालवणच्या पर्यटनात एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. पर्यटक संख्या वाढी बरोबरच मालवणच्या व्यापारात पण वृद्धी होणार आहे. मालवण रेवतळे याठिकाणी हे मत्स्यालय प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यामुळे रॉक गार्डन याठिकाणी ज्याप्रमाणे स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाले त्याप्रमाणे याठिकाणी देखील स्थानिकाना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे, असेही महेश कांदळकर यांनी म्हटले आहे.
