संमेलनाच्या अध्यक्षपदी स्त्रीवादी लेखिका संध्या नरे- पवार; समितीचे अध्यक्ष कॉ संपत देसाई आणि अंकुश कदम यांची माहिती…
सावंतवाडी ता.२७-:* दलित पँथरच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त सावंतवाडी येथे ७ आणि ८ मे ला जनवादी साहित्य संस्कृती संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून, या संमेलनाचे अध्यक्षपद स्त्रीवादी लेखिका तथा वरिष्ठ पत्रकार संध्या नरे – पवार भूषविणार असल्याची माहिती संयोजन समितीच्या वतीने अध्यक्ष कॉ संपत देसाई व सचिव अंकुश कदम यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.
यावेळी समितीच्या कार्याध्यक्षा प्रा. प्रतिभा चव्हाण, प्रसिध्दी प्रमुख मोहन जाधव, प्रकाश मोरजकर, महेश पेडणेकर, रजित कालेलकर, युवराज जाधव, प्रज्ञा मातोंडकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, सत्तरच्या दशकात वादळ उठविणाऱ्या दलित पँथर या तरुणाईच्या झंझावाती संघटनेने केवळ राजकारणातच नव्हे तर साहित्य संस्कृतीच्या क्षेत्रातही प्रचंड उलथापलथ केली होती. या संघटनेला यावर्षी ५० वर्ष पूर्ण होत असल्याने सावंतवाडी येथे सिंधुदुर्ग, दक्षिण कोल्हापूर आणि गोवा जिल्ह्यातील परिवर्तनवादी चळवळीच्या वतीने हे साहित्य संस्कृती संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
संध्या नरे पवार या गेली पंचवीस वर्षाहुन जास्त काळ एक ठाम भूमिका घेऊन पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्य करत असून, त्यांनी जात वर्गीय संदर्भाने स्त्री प्रश्नांची नेमकी मांडणी करून, दलित, आदिवासी, बहुजन स्त्रियांचे प्रश्न समाजासमोर आणण्याचे काम केले आहे. त्यांनी “डाकीण एक अमानवी प्रथा” , “शोध आणि अनव्यार्थ” आणि “तिची भाकरी कुणी चोरली” या पुस्तकातून स्त्रियांच्या प्रश्नांना हात घातला आहे. त्यांनी केलेल्या लेखनामुळे महाराष्ट्र फाउंडेशन, राज्य साहित्य संस्कृती मंडळ, यशवतंराव दाते स्मृती संस्था यासारख्या अनेक संस्थांनी त्यांना पुरस्कार दिले आहेत.अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
