वेंगुर्ला ता.२०-:* तत्कालीन पालकमंत्री तथा विद्यमान आमदार दिपक केसरकर यांच्या प्रयत्नाने ४ कोटी ३० लाख रूपयांच्या रक्कमेतून पर्यटनदृष्ट्या साकारत असलेल्या नवाबाग ते वेंगुर्ला बंदररोडला जोडणा-या झुलत्या पुलाचे काम अंतिम टप्यात आलेले आहे. येत्या दोन महिन्यात हे काम पूर्णत्वास येणार असल्याची माहिती झुलत्या पुलाचे काम करणारे महंमद इलियास यांनी शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत परब यांच्या पहाणीवेळी दिली.
गेली सुमारे ५ वर्षे झुलत्या मुलाचे काम विविध तांत्रिक अडचणी तसेच कोरोना काळ आणि चीन देशातून या पुलासाठी येणारे सामान यामुळे रखडलेले होते. मात्र आता हा झुलत्या पुलाचे काम पुणे येथील मनोज स्थापत्य या संस्थेने घेऊन ती संस्था युध्द पातळीवर या पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध झालेले असून येत्या दोन महिन्यात ते निश्चितपणे पूर्णत्वास येईल.
या पुलाच्या पहाणीसाठी व माहिती घेण्यासाठी आलेल्या शिवसेना शिष्टमंडळास मनोज थापत्य पुणे या संस्थेचे महंमद इलियास व संदिप तुळसे यांनी दिली. वेंगुर्ल्यातील पर्यटनासाठी महत्वपूर्ण ठरणारे असे वेंगुर्ला बंदररोड वरुन थेट नवाबाग किनारा असे काम होत असलेल्या झुलत्या पुलाची शिवसेना वेंगुर्ला तालुका प्रमुख यशवंत परब, उपजिल्हा प्रमुख सुनिल डुबळे, सचिन वालावलकर, शहर प्रमुख अजित राऊळ, शिवसेना महिला तालुका आघाडी प्रमुख सुकन्या नरसुले, माजी नगरसेवक तुषार सापळे, शहर समन्वयक विवेक आरोलकर, युवा सेना तालुका अधिकारी पंकज शिरसाट, हेमंत मलबारी, उषा प्रभूखानोलकर, रूपा प्रभूखानोलकर, कोमल सरमळकर आदींनी पहाणी केली.
