खास.विनायक राऊत यांना व्यापारी असोसिएशनचे निवेदन
कणकवली ता१९-:* सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशदरावर असलेल्या आणि आजूबाजाऊच्या सुमारे ४० ते ५० गावाचे केंद्रबिंदू असणाऱ्या खारेपाटण या गावातील ऐतिहासिक व ब्रिटिशकालीन बाजारपेठेतुन थेट घोडेपाथर बंदर पर्यंत जाणाऱ्या रस्त्याची सध्या दयनीय अवस्था झाली असून, या मुख्य बाजारपेठेच्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे.तर या रस्त्यावरून नागरिकांना चालणेही कठीण झाले आहे. अत्यंत दयनीय अवस्था झालेल्या या रस्त्याच्या डागडुजी बाबत नुकतीच खारेपाटण व्यापारी असोसिशनच्या कार्यकर्त्यानी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांची भेट घेऊन आपल्या मागणीचे लेखी निवेदन त्यांना सादर केले आहे.
या रस्त्याच्या नूतनीकरणासाठी अनेक सामाजिक संस्था, मंडळे व संघटना मार्फत संबंधित विभागाला व लोकप्रतिनिधींना निवेदने देऊन हा रस्ता दुरुस्त करण्याबाबत विनंती करण्यात आली आहे, परंतु गेली तेरा वर्षे हा रस्ता दुरुस्ती ची वाट पाहत आहे. सध्याची परिस्थिती पाहता “रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता” हीच संभ्रमावस्था ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली आहे .
संभाव्य तालुका निर्मिती कडे वाटचाल करीत असलेल्या खारेपाटणच्या या मुख्य बाजारपेठेतील रस्त्याकडे दुर्लक्ष होत राहिले आहे. या रस्त्याच्या गैरसोयबाबत आपली व्यथा मांडण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना महिला उपसंघटक सौ मीनल तळगावकर यांनी खारेपाटण व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यां समवेत रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खास.विनायक राऊत यांची भेट घेतली. जिल्हा व्यापारी संघाचे सदस्य व पत्रकार योगेश गोडवे व्यापारी असोसिएशन अध्यक्ष वीरेंद्र चिके उपाध्यक्ष चंद्रकांत शेट्ये माजी अध्यक्ष मंगेश गुरव ज्येष्ठ व्यापारी सचिन सप्रे,सुधीर गांधी, प्रकाश मोहिरे यांनी या रस्त्याच्या कामासंदर्भात खास. विनायक राऊत यांच्याशी चर्चा करून तात्काळ या रस्त्याच्या दुरुस्ती संबंधित कार्यवाही व्हावी अशा स्वरूपाचे निवेदन दिले. खा. विनायक राऊत यांनी त्वरित संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून या रस्त्याच्या काँक्रिटीकरण याबाबत त्वरित कार्यवाही व्हावी अशा सूचना केल्या. त्याच प्रमाणे तशा स्वरूपाचे सही चे शिफारस पत्र संबंधित कार्यालयाला सुपूर्द केले. आणि हा रस्ता प्रामुख्याने विचारात घेतला जाईल असे आश्वासन दिले.
खारेपाटण मुख्य बाजारपेठेतील हा रस्ता राजकारण्याच्या मतांच्या बेरजेत कुठेतरी मागे पडतो आहे.असे सध्याचे चित्र असून गेली १३ वर्षा पासून हा रस्ता विकासाच्या प्रक्रियेत मागे पडत चालला आहे.खारेपाटण बाजारपेठेत दरवर्षी पुराचे पाणी घुसून येथील व्यापारी वर्गाचे नुकसान होत आहे.याच बरोबर रस्त्याची सुद्धा झीज होऊन चिखल व घाण साचून नुकसान होत आहे. रस्त्याला भुयारी गटार सेवा नसल्याने ऐन पावसाळ्यात रस्त्यावरून वाहणाऱ्या गुडघाभर पाण्यातूनच शालेय विद्यार्थी व नागरिकांना जावे लागत आहे.तर वाहनांच्या रहदारीमुळे रस्त्यावरील चिखलाचे पाणी बाजरपेठेतील व्यापाऱ्याच्या दुकानात उडत आहे.विविध राजकीय पक्षाचे नेते कार्यकर्ते मात्र खारेपाटण बाजारपेठेतील रस्त्याच्या बाबतीत आश्वासनाची बरसात करून जात आहेत.मात्र कारवाई शून्य दिसत आहे.त्यामुळे येथील व्यापारी व नागरिक हैराण झाले आहेत.
