कणकवली ता१८-:* कोरोनामुळे मागील दोन वर्षात शिमगोत्सव सण अगदी साधे पणाने साजरा करण्यात आला.यंदा कोरोना परस्थिती निवळल्याने कणकवली शहरासह गावा गावात शिमगोत्सवाची धामधूम पाहवयास मिळत आहे.
कोकणातील शिमगोत्सव हा मोठा सण मानला जातो.या उत्सवात गावा गावातील मांडावर सोंगे,कोळी गीत या सोबतच रोंबाट काढले जाते.
गुरुवारी सायंकाळी कणकवली शहरातील गाव होळीचे पारंपारिक पद्धतीने ढोल ताशाच्या गजरात आंब्याचे झाड खांद्यावरून आणण्यात आले.गावाच्या चव्हाट्यावर रात्री पूजन करून रोंबाट काढले गेले.यासोबतच शहरात परंपरेनुसार होलिका आणून पूजन करून गाऱ्हाने असे आदी कार्यक्रम पार पडले.तर आज शुक्रवारी सकाळी झेंडा चौक येथे बाजरपेठेतील होळीचे पूजन करून दहन करण्यात आले.यावेळी गावपुरुष,मानकरी,पेठकरी मंडळी तसेच ग्रामस्थ उपस्थितीत होते. या शिमगोत्सवात घरोघरी निशाण फिरवण्याची देखील प्रथा आहे. हा शिमगोत्सव सोहळा काही ठिकाणी पाच दिवस सात दिवस तर पाडव्या पर्यंत हा शिमगोत्सव साजरा केला जातो.
