वेंगुर्ला ता.१८-:* वेंगुर्ला तालुक्यात गुरुवारपासून होळी उत्सवाला प्रारंभ झाला असून गुरुवारी व शुक्रवारी प्रत्येक ठिकाणच्या परंपरेनुसार आंब्याची व सुपारीच्या झाडाची म्हणजेच पोफळीची होळी घालण्यात आली. शुक्रवारी विविध रंगांची उधळण करीत रंगपंचमीही साजरी करण्यात आली.
कोकणात इतर सणांबरोबरच होळी सणाला फार महत्त्व आहे. गुरुवारी सायंकाळी ७ नंतर होळी उत्सवाला प्रारंभ झाला. ढोल ताशांच्या गजरात आंब्याच्या पोफळीच्या होळी नाचवत नाचवत ज्या ठिकाणी घातली जाते त्याठिकाणी आणण्यात आली. तेथे पूजन करुन गा-हाणे करण्यात आले. वेंगुर्ला शहरात गुरुवारी रात्री दाभोसवाडा, विठ्ठलवाडी, गिरपवाडा, भुजनाकवाडी, पूर्वस मंदिर, होळकर मंदिर, दत्तमंदिर, सुंदर भाटले याठिकाणी होळी घालण्यात आली. तर शुक्रवारी सकाळी कुबलवाडा तसेच सायंकाळी देऊळवाडा, परबवाडा याठिकाणी होळी घालण्यात आली. या उत्सवात अबालवृद्धांनी सहभाग घेऊन होळी उत्सवाचा आनंद लुटला.
